जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची लसीकरण केंद्राना भेट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

एकही पात्र लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन

 ऊस तोडणी कामगारांचे ही लसीकरण करण्याची सूचना

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी देशात व राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज(दि.1) माळशिरस तालुक्यातील विविध  लसीकरण केंद्रांना भेटी देऊन येथील लसीकरण मोहीमेची माहिती घेतली व एक ही पात्र लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आनंदनगर तसेच चाकोरे, कोंडबावी, विजयवाडी येथील आरोग्य उपकेंद्रांना भेट देऊन लसीकरणाबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच जावळे वस्ती, तरसे वस्ती येथील ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणी  प्रत्यक्ष भेट देवून ऊस कामगारांच्या लसीकरणाबाबत माहिती जाणून घेतली.      

        यावेळी  तहसिलदार जगदिश निंबाळकर, नायब तहसिलदार अशिष सानप, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.संकल्प जाधव तसेच आरोग्य अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

         जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. प्रशासनाने सर्वच पात्र व्यक्तींना लस घेणे बंधनकारक केले आहे. कोणताही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजनातून काम करीत आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोणताही पात्र व्यक्ती लसिकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता आरोग्य तसेच संबधित यंत्रणेने घ्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या. देशात व राज्यात ओमायक्रॉन च्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक जागरूक नागरिकांनी स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे 100% लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

            जिल्ह्यात उस गाळप हंगाम सुरु असल्याने विविध जिल्ह्यातून उस तोडणी कामगार  विविध साखर कारखान्याकडे आले आहेत. त्या कामगारांचेही लसीकरण करण्यासाठी संबधित साखर कारखान्यांनी आवश्यक नियोजन करुन, आरोग्य विभागाच्या मदतीने लसीकरण  मोहिम राबवून लसीकरण  करुन घ्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here