चोरटी वाळू वाहतूक करणार्या टिपरवर डी.वाय.एस.पी.ची कारवाई ,तीघांविरूध्द गुन्हा दाखल
भिमा नदीच्या पात्रातून 4 ब्रास वाळू 40 हजार रुपये किमतीची टिपरमध्ये घेवून जात असताना मंगळवेढयातील टोळ नाक्यावरून डी.वाय.एस.पी.कार्यालयातील पोलिसांनी पकडून आशितोष तानाजी आसबे,ओंकार भारत भोसले,प्रशांत संताजी भोसले(सर्व रा.सरकोली ता. पंढरपूर) या तीघांविरूध्द वाळू चोरी व पर्यावरणाचा र्हास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,सरकोली येथील भिमा नदीपात्रातून 4 ब्रास वाळू घेवून टिपर मंगळवेढयाकडे येत असल्याची गोपनीय माहिती मंगळवेढा विभागाच्या पोलिस उपअधिक्षक राजश्री पाटील यांना मिळताच त्यांनी दि. 14 रोजी सायंकाळी 5.00 वा. टोळ नाक्यावर पोलिसांचा सापळा लावला असता एम एच 25/टी.5485 हा टिपर वाळू घेवून टोळ नाक्यावरील रानवारा ढाब्यासमोर येत असताना पोलिसांनी पकडून वाळूसह टिपर 12 लाख 40 हजार रुपये किमतीचा जप्त केला आहे. याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत साळुंखे यांनी दिल्यावर वरील तीघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलची आठ पथके कार्यरत केली आहेत. मात्र गेली आठ दिवस त्यांचा संप आल्याने या संधीचा फायदा वाळू तस्कर रात्रीच्यावेळी उचलत असल्याने पोलिस प्रशासनाने जागरूक होवून कारवाईचे सत्र अवलंबावे अशी मागणी होत आहे.