गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याच्या प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घ्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे विमा कंपन्यांना निर्देश 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि.17: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव सादर केले आहेत. प्रत्येक अपघातग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ त्वरित मिळायला हवा. विमा कंपन्यांनी प्रलंबित प्रस्तावावर एका आठवड्यात निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद

शंभरकर यांनी संबंधितांना दिले.
           गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना समन्वय समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
             श्री. शंभरकर यांनी सांगितले की, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवू नयेत. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने शेतकरी अथवा त्यांचे नातेवाईक आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांचे एकत्र शिबीर घ्यावे. नेमकी कोणती कागदपत्रे हवी आहेत, ते शिबीरातून समजून येईल. शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी विमा कंपनीने पुढाकार घेऊन प्रस्तावावर निर्णय घ्यावा. पोलीस विभागाने पंचनामे आणि इतर कागदपत्रासाठी सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
            2018-19 मध्ये 212 प्रस्ताव सादर झाले होते. यापैकी 168 प्रस्ताव मंजूर झाले तर 43 नामंजूर आहेत. 2019-20 मध्ये 289 प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 207 प्रस्ताव मंजूर झाले तर 36 नामंजूर आहेत. 12 प्रस्तावावर कार्यवाही सुरू असून कागदपत्राअभावी 34 प्रस्ताव प्रलंबित आहेत. 2021-22 मध्ये 145 प्रस्ताव सादर झाले होते, त्यापैकी 25 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. दोन नामंजूर तर 69 प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. यामध्ये 96 प्रस्ताव कंपनीला सादर झाले असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली.
मार्चच्या अगोदर गट शेतीची कामे पूर्ण करा
      शासनाला गट शेतीतून शेतकऱ्यांचा विकास साधायचा आहे. प्रस्ताव सादर केलेल्या गट शेती प्रमुखांनी कामे सुरू करावीत. संपूर्ण कामे मार्चच्या अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी केल्या. गट शेतीला प्रोत्साहन व सबलीकरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या गटशेतीला चालना देणे योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी आर.ए. शेख, मोहीम अधिकारी अशोक मोरे यांच्यासह गट प्रमुख उपस्थित होते.
       श्री. शिंदे यांनी सांगितले की, यंदा तीन कोटी 21 लाख 81 हजार रूपये इतका निधी जिल्ह्याला प्राप्त आहे. मार्च अखेर कामे पूर्ण व्हायला हवीत. गट शेती प्रमुखांनी पूर्व संमतीसाठीचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत. प्रत्येक गटांची बैठक घेऊन सर्व सदस्यांना बाब बदल केल्याची कल्पना द्या. एक महिन्यामध्ये उद्दिष्टपूर्ती करा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here