गाव कार्यक्षेत्र असताना 2 तालुक्यातील 11 गावात मतदार! खेडभोसे येथील सोसायटी मधील धक्कादायक प्रकार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

खेडभोसे विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यक्षेत्र हे खेडभोसे गाव मर्यादित असताना संचालक मंडळाने चक्क पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील तब्बल 11 गावांमधील सभासद खेडभोसे सोसायटीला संलग्न करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, दरम्यान विरोधी गटाने ही या 2 तालुक्यातील 11 गावांमध्ये स्पीकर द्वारे प्रचार करण्याची परवानगी मागितली आहे.

खेडभोसे (ता. पंढरपूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, खेडभोसे या संस्थेचे नूतन संचालक मंडळ निवडण्यासाठी निवडणूक लागली असून 3 जून रोजी मतदान आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र हे खेडभोसे गाव आहे आणि एकूण सभासद मतदार 1024 आहेत. सध्याच्या संचालक मंडळाने नियमबाह्यपणे खेडभाळवणी, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, शेवते, पेहे, देवडे, भोसे, व्होळे, अजोती, पंढरपूर, सांगोला या 11 गावातील तब्बल 325 लोकांना संस्थेचे सभासद करून घेतले आहे. ही बाब निवडणुक मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उघड झाली, तयार विरोधी गटाने आक्षेपही घेतला होता, मात्र हा आक्षेप फेटाळण्यात आला.

त्यामुळे बिथरलेल्या विरोधी गटाने चक्क या कार्यक्षेत्रा बाहेरील गावात प्रचार करण्यास निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. मात्र खेडभाळवणी, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, शेवते, पेहे, देवडे, भोसे, व्होळे, अजोती, पंढरपूर, सांगोला ही गावे संस्थेच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र फक्त खेडभोसे गावापुरते मर्यादित असल्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी वाय. के. काकडे यांनी काही अटी घालून संस्थेच्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित परवानगी दिली आहे.

दरम्यान, याच नियमाचा आधार घेत या निवडणुकी मधील एक उमेदवार बंडू पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे, मतदार हा स्थानिक असल्याची खात्री करुनच मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी रहिवाशी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, 7/ 12 उतारा, तसेच शासनाचे इतर ओळखपत्र पाहूनच मतदान करू द्यावे, अशी लेखी मागणी केली आहे. तसेच बाहेर गावातील मतदार मतदानास आल्यास गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडू शकतो, त्यामुळे अशा लोकांवर फौजादरी कारवाई करावी, अशीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

एकूणच नियमबाह्य कामामुळे खेडभोसे सोसायटी ही चर्चेत आली असून आता कार्यक्षेत्राबाहेरील सभासद मतदार दाखवून निवडणुक लढविली जात आहे, त्यामुळे या निवडणुकीची तालुक्यात चर्चा रंगली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here