कोषागार दिननिमित्त 30 जणांचे रक्तदान जिल्हा कोषागार कार्यालयात कोषागार दिन साजरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि.2 (जिमाका): जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर यांच्यामार्फत कोषागार दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. कोषागार दिनानिमित्त आज झालेल्या रक्तदान शिबिरात 30 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, स्थानिक निधी लेखा कार्यालयाचे सहायक संचालक विशाल पवार यांनी लेखाविषयक आणि कोषागार दिनाचे महत्व विषद केले. यावेळी हास्यकलाकार प्रा. दीपक देशपांडे यांच्या हस्ते कोषागारातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट कर्मचारी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी एस. आर. मोमीन होते.

             01 जानेवारी 1962 रोजी लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना करण्यात आली असून राज्य शासनाने 01 फेब्रुवारी 1965 पासून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्वतंत्र सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी 01 फेब्रुवारी हा दिवस कोषागार दिन म्हणून साजरा केला जातो.

            दुपारच्या सत्रामध्ये कोषागारातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन कोषागार दिनाचा आनंद द्विगुणित केला. जिल्हा कोषागार कार्यालयाबरोबरच जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालयामध्येही कोषागार दिन उत्साहाने साजरा झाला. याप्रसंगी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करुन, कार्यालयाची सजावट करुन कोषागार दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

            अप्पर कोषागार अधिकारी सुनिल यादव यांनी आभार मानले. कोषागार दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरात जिल्हा कोषागार कार्यालयातील 30 पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here