ओबीसी आरक्षणामुळे भल्या भल्या उमेदवारांना उमेदवारीला मुकावे लागणार! (31 जुलै रोजी प्रारूप यादी जाहीर होणार)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी ओबीसी व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण 63 पैकी 49 जागांचे थेट आरक्षण काढण्यात आले तर उर्वरित जागांसाठी सोडत काढण्यात आली.

ही प्रक्रिया तीन टप्प्यांत अवघ्या सव्वा तासात पूर्ण झाली. दरम्यान, ओबीसींच्या समावेशाने निवडणुकीत रंगत आली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून याआधी मनपाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोलापूरसह अनेक मनपांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. यापूर्वी ओबीसी आरक्षणशिवाय निवडणुकीचा निर्णय झाल्यावर 31 मे रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.

या पार्श्‍वभृमीवर न्यायालयाच्या नव्या आदेशाानुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी नियोजन भवनात सोलापूर मनपासाठी ओबीसी व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, उपअभियंता लक्ष्मण चलवादी, नगरसचिव प्रवीण दंतकाळे आदी उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या विविध नियमांच्या आधारे ही प्रक्रिया पार पडली. सर्वप्रथम ओबीसी जागांचे आरक्षण काढण्यात आले. यापूर्वी काढलेल्या अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित झालेल्या 18 जागा या 17 प्रभागांमध्ये निश्‍चित असल्याने एकूण 38 प्रभागांमधून 17 प्रभाग वगळून शिल्लक राहिलेल्या 21 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 अशा एकृूण 21 जागांचे थेट आरक्षण काढण्यात आले. तद्नंतर ज्या प्रभागात 1 जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी राखीव असेल अशा तीन 3 सदस्यीय प्रभागांपैकी जेथे किमान जागा अराखीव आहेत, अशा 15 प्रभागांमधून उर्वरित 9 ओबीसी जागांची सोडत काढण्यात आली.

दुसर्‍या टप्प्यात जे प्रभाग अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित पण तिथे या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव नाहीत अशा प्रभागांमधून ओबीसी महिलांच्या 15 जागांचे आरक्षण काढण्यात आले. याअंतर्गत 5 थेट व सोडतीने 10 जागा आरक्षित करण्यात आल्या. तिसर्‍या टप्प्यात सर्वसाधारण महिलांसाठी 33 जागा निश्‍चितीसाठी सोडत काढण्यात आले. यानुसार 28 थेट व 5 जागा सोडतीद्वारे निश्‍चित करण्यात आल्या. ओबीसीच्या 30 जागांपैकी 21 जागांचे व सर्वसाधारण महिलांसाठीच्या 33 जागांपैकी 28 असे मिळून एकूण 49 जागांचे थेट आरक्षण काढण्यात आले. ओबीसीच्या 30 जागांचे आरक्षण निश्‍चित झाल्यावर त्यामधील15 जागा ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात झाल्या. यापैकी 5 तर सर्वसाधारण महिलांच्या 33 पैकी 28 जागांचे थेट आरक्षण काढण्यात आले. उर्वरित जागांसाठी सोडत काढण्यात आली. अवघ्या सव्वा तासात ही प्रक्रिया पार पडली.

 

आरक्षणाच्या सोडतीची प्रक्रिया झाल्यानंतर आता शनिवारी (दि. 30) रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी 30 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत मुदत राहणार आहे. अंतिम यादी ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सोडत कार्यक्रमानंतर जाहीर केले.

आरक्षणाची सोडत राजीव गांधी मेमोरियल स्कूल ऑफ ब्लाईंडचे काळूबाई जाधव, भैरुरतन दमाणी अंधशाळेचे सुजाता माळी, दर्शना लेंडवे, योगीराज धनवे, कार्तिक जानकर या दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here