ऊस तोडणी मुकादम व मजूर यांच्याकडून होणाऱ्या फसवणूकबाबत गुन्हे दाखल होणार आ.बबनदादा शिंदेच्या लक्षवेधीला सहकारमंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असून, ऊस वाहतुकदार हे ऊस तोडणी व वाहतुकीचा करार साखर कारखान्याकडे करत असतात. ऊस वाहतूकदार हे शेतकऱ्यांची मुले असून काही सुशिक्षित बेरोजगार तरुण ऊस वाहतूकीचा व्यवसाय करत आहेत. परंतू ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहन मालक शेतकऱ्यांकडून तोडणी मजूर पुरवणारे मुकादम लोखो रुपये उचल घेतात व मजूर पुरवठा न करता वाहन मालकाचे पैसे बुडवतात. त्यामुळे अनेक वाहनमालकांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे त्यांच्यावर कायद्याने कारवाई होण्याबाबत आ.बबनदादा शिंदे यांनी नागपूर अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना देऊन आपली भूमिका शासनाकडे मांडली.

 

याबाबत माहीती देताना आ.बबनदादा शिंदे म्हणाले की, ऊस वाहतुकदार बीड, धुळे, नंदुरबार, नांदेड, अहमदनगर, यवतमाळ, हिंगोली तसेच कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात या भागातून ऊस तोडणीसाठी मजूर करार करुन संबंधीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असतात. ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहन मालक शेतकऱ्यांकडून तोडणी मजूर पुरवणारे मुकादम लोखो रुपये उचल घेतात व मजूर पुरवठा न करता वाहन मालकाचे पैसे बुडवतात. गळीत हंगामामध्ये काही मजूर मधूनच पळून जातात. वाहन मालकाला धमक्या देतात,ॲट्रॉसिटीच्या केसेस दाखल करतात, मारहाण करतात, जीवे मारण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत. अशा घटना सातत्याने घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 30 ते 32 साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांचे मुकादमांनी मागील गळीत हंगामामघ्ये 39 कोटी रुपये बुडवले आहेत. याबाबत वाहनधारक हे संबंधीत पोलिस स्टेशनला मुकादमाकडून झालेल्या फसवणूकीची तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करुन घेत नाहीत. याउलट वाहन मालक संबंधित मुकादम,मजूर यांना बोलल्यास किंवा कायद्याची भाषा वापरल्यास हेच मुकादम व मजूर वाहन मालकांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत असता त्यांची दखल पोलिस स्टेशनमध्ये घेतली जाते. याचे उदाहरण म्हणजे माढा तालुक्यातील गणेश पोपट ढोरे रा. रिधोरे व यशवंत शंकर खोटे रा.अंजनगांव (उमाटे) येथील वाहन मालकांना तुरुंगात जावे लागले. तसेच नुकतीच बेंबळे ता.माढा,जि.सोलापूर येथील ऊस वाहतुकदार प्रशांत (आण्णा) महादेव भोसले हे मध्यप्रदेशातील ऊस तोड मजूर घेवून येत असताना दि.30 ऑक्टोंबर, 2022 रोजी खांडवा (मध्यप्रदेश) पासून अर्धा कि.मी.अंतरावर चिचोरी या ठिकाणी मुकदम व मजूर यांनी संगनमत करुन त्यांच्या जवळील पैसे व मोबाईल घेवून त्यांची निर्घृण हत्या केली. यामुळे ऊस वाहतूक करणारे वाहनधारक यांची आर्थिक फसवणुकीमुळे राज्यात दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत लक्षवेधी उपस्थित करत दोषींवर कारवाई करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी लक्षवेधी सुचनेवर विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे ,हसन मुश्रीफ, विनय कोरे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

 

आ.शिंदे यांच्या लक्षवेधी सुचनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे सहकारमंत्री ना.अतुल सावे म्हणाले की, साखर कारखान्यासंदर्भात सर्व यंत्रणांची बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच पुढील काळात साखर कारखान्यांना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजा करण्यात येणार. तसेच दोषींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले.

 

चौकट –

09 जानेवारी रोजी होणार संयुक्त बैठक – ना.सावे, सहकारमंत्री,

आ.बबनराव शिंदे यांच्या या लक्षवेधीवर अधिक उत्तर देताना अतुल सावे यांनी सांगितले की, ऊस तोडणी करणारे मजूर व त्यांचे मुकादम यांचेकडून वाहनमालकांची फसवणुक करणे ,धमक्या देणे,यांचेवर गुन्हे दाखल करणे लाखो रुपये बुडविणे, यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी गृह विभाग, सहकार विभाग, साखर आयुक्त यांची संयुक्त बैठक दि.09 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे घेणार असल्याचे सांगितले. या बैठकीस प्रश्न उपस्थित करणारे व अजितदादा पवार यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here