उजनीच्या पाण्याबाबत आ. समाधान आवताडे आक्रमक, सत्ताधाऱ्यांना दिला सज्जड इशारा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उजनीतील ५ टीएमसी पाणी सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली इंदापूर व बारामतीला पळविण्याचा कुटील डाव कोणत्याही परिस्थितीमध्ये सफल होऊ देणार नाही असा इशारा पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी दिला आहे.

आ. समाधान आवताडे यांनी म्हटले की, सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी मागच्या दाराने पळविण्याचा प्रयत्न करून जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने कधीही सफल होऊ देणार नाही असा घणाघात आ. समाधान आवताडे केला आहे. उजनी धरणातील पाण्याचे संपूर्ण वाटप झाले असताना सांडपाण्याच्या नावाखाली पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उध्ववस्त होत आहे. अद्यापही जिल्ह्यातील जवळपास दहा सिंचन योजना अपूर्ण असताना हा खटाटेप कशासाठी ? असा प्रश्नही आ. समाधान आवताडे यांनी उपस्थित केला आहे.

 

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पाणीप्रश्नाचे घोंगडे वर्षानुवर्षे निधीअभावी भिजत पडलेले आहे. तसेच उपसा सिंचन योजना, शिरापूर उपसा सिंचन योजना, एकरुख उपसा सिंचन, कुरुनूर उपसा सिंचन योजना आदी योजनांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे व योजना मार्गी लावून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असताना पालकमंत्री यांची ही पाणी पळविणे कोणती कार्यनैतिकता आहे ? असा परखड सवालही आ. समाधान आवताडे यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असताना केवळ आपल्या राजकीय स्वार्थापोटी ही सगळी उठाठेव चालली आहे. जिल्ह्याचे पालकत्व जबाबदारी खांद्यावर असताना जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडून सदर प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावणे अपेक्षित आहे. परंतु वास्तविक प्रश्नांना बगल देत केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जनतेला गृहीत धरून जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर कोणी डाव साधत असेल तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी मंडळींनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून जिल्ह्याचे नुकसान टाळण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचेही आ. समाधान आवताडे यांनी म्हटले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here