आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली माळशिरस तालुक्याची आढावा बैठक (अनेक प्रलंबित प्रश्न लागले मार्गी)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील यांनी आज यशवंतनगर येथे माळशिरस तालूक्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये वीज, पाणी, बंधारे, गटारी, रस्ते, रेशन कार्ड असे नागरीकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले.

या बैठकीस आमदार राम सातपुते ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, तहसिलदार जगदिश निंबाळकर, पं.स.चे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता बोडके, महावितरणचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांच्यासह आरोग्य, कृषी, लघु पाटबंधारे, महसुल, शिक्षण विभाग, पंचायत समिती यांचे अधिकारी व तालुक्यातून आलेले सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गिरझणी ग्रामपंचायतीच्या नागरीकांनी गिरझणी ते संग्रामनगर या रस्त्याचे काम सुरू होऊन आता मुदत संपली आहे. पण रस्त्यावर पक्त खडीच पडली डांबरीकरण मात्र झाले नाही अशी तक्रार करताच आ. मोहिते-पाटील यांनी लगेच ठेकेदाराला उभा करून कारण विचारले असता सध्या खडी उपलब्ध नाही. खडी उपलब्ध झाली की कामाला सुरूवात करतो असे उत्तर मिळाले.

अनेक नागरीक गावांतील रस्त्यांची कामे होत नाहीत याबद्दल तक्रार करतात. परंतू सदर रस्ते ग्रामिण मार्ग अंतर्गत ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेले नसतात. त्यामुळे अशा रस्त्यांच्या कितीही तक्रारी आल्या तर त्याचे काम निधी अभावी सुरू होत नाही. त्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांनी स्टॅम्प पेपरवरती संमती लिहून देवून ग्रामपंचायतीकडे वर्ग करावेत. ग्रामपंचायतींनी या रस्त्याबाबत ठराव करून तो संबंधित खात्याकडे दिल्यास सदर रस्ता ग्रामिण मार्ग म्हणून नोंदला जाईल व त्यासाठी आमदारांना निधी मागता येईल असे आमदारांनी सांगितले व अधिकार्‍यांना या बाबत सुचना दिल्या.

माळशिरस तालुक्यातील ७५ गावांमधील ओढे, तलाव हे अति उपसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. लवकरच या प्रत्येक गावात संबंधित विभागाचे अधिकारी बैठक ठेवतील, शिवार फेरी काढतील व माहिती घेऊन सदर ओढे, तलाव यांची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी जि. प. गट बोरगांव, वेळापूर, पिलीव, निमगांव, संग्रामनगर, यशवंतनगर मधील गावांतील नागरीकांनी डिपी, रस्ते, बंधारे, गटारी, रेशन कार्ड याविषयी आपल्या तक्रारी मांडल्या. रेशनकार्ड धारकांनी त्यांना अद्याप माल मिळत नसल्याची तक्रार करताच तहसिलदार निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातील सुमारे २५ हजार केशरी कार्ड धारकांना माल मिळत नसल्याचे सांगितले. यावर कारण देताना ते म्हणाले की, सदर केशरी कार्ड धारकांचे अद्याप आमच्याकडे इष्टांक आला नाही. लवकरच याबाबतीत कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती दिली.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ज्या गावातील २५ के. व्ही. डीपीवरती लोड येऊन वारंवार जळत असतील अशा ठिकाणी ६३ के. व्ही. क्षमतेचे डिपी बसवावेत. आनंदनगर भागातील बंधाऱ्यांची दारे खराब झाल्याने तेथून पाणी गळती होत आहे. उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर बंधाऱ्यांच्या दारांची दुरुस्ती करण्यात यावी. रस्ते व गटारांची कामे तातडीने हाती घ्यावीत अशा अधिकाऱ्यांना सुचना देवून अनेक महिने व वर्षापासून खोळंबलेली विविध गावांतील कामे मार्गी लावली..

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नागरिकांच्या समक्ष संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करत प्रश्नांची सोडवणूक केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here