‘आदिनाथ’साठी बबनदादांचा मुलगाही मैदानात : बारामती ॲग्रोला अडचण असेल तर आम्ही महिन्यात सुरू करू

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर // प्रतिनिधी

बारामती ॲग्रोला आदिनाथ कारखाना सुरू करायाला अडचणी येत असेल  तर तो आम्ही चालवायला घेऊन एका महिन्यात सुरू करू, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव आणि करमाळा तालुक्यातील कमलाभवानी रिफाइंड शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे  केले आहे.

करमाळा तालुक्यातील पांडे येथील कमलाभवानी रिफाइंड शुगर या साखर कारखान्याच्या सहाव्या अग्नीप्रदिपन  सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी गुरूवारी (ता. १४ ऑक्टोबर) ते बोलत होते. शिंदे यांनी आदिनाथ चालवण्यास देण्याचे एक प्रकारे आवाहन केले असून आता सत्ताधारी बागल गट  यावर काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे. विक्रमसिंह शिंदे हे माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव, तर करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे यांचे पुतणे आहेत. विक्रमसिंह शिंदे यांच्या या विधानाने आदिनाथ कारखाना सुरुवातीपासूनच घेण्यासाठी शिंदे इच्छुक होते, या चर्चेला आज दुजोरा मिळाला.

 आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. एकीकडे आदिनाथ घेण्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव विक्रमसिंह शिंदे यांच्यात स्पर्धा लागली असून सत्ताधारी मंडळी मात्र आदिनाथ चालवण्यात अपयशी का झाली? सत्ताधारी मंडळींनी हा साखर कारखाना 25 वर्षांसाठी बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मागील वर्षी सर्वसाधारण सभेत घेतला आहे. गेली दीड वर्षापासून आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याची चर्चा सुरू आहे, तसा करारही करण्यात आला आहे. मात्र, एमएससी बँक व एनसीडीसी यांच्या कर्जप्रकरणात या कारखान्याची प्रक्रिया अडकल्याचे सांगितले जात आहे.

बारामती ॲग्रोला हा कारखाना कशा पद्धतीने भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला, हे अद्यापही सत्ताधारी बागल गटाकडून सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मागील महिन्यात होणार वार्षिक सर्वसाधारण सभा घोषणा करूनही रद्द करण्यात आली. वारंवार मागणी करूनही ‘बारामती ॲग्रो’बरोबर कसा करार झाला? ही  माहिती लपवून का ठेवण्यात आली आहे , असा आरोप काही संचालकांनी करत राजीनामेही दिले आहेत.

या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे  यांचे चिरंजीव माढा पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी थेट आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन एका महिन्यात सुरू करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. एका बाजूला आदिनाथ पुढच्या वर्षी सुरू करू  , असे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले आहे.

विक्रमसिंह शिंदे यांनी आदिनाथ एक महिन्यात सुरू करू, असे सांगितले असले तरी कारखान्याच्या अडचणी कशा सोडवणार? कामगारांच्या पगारीचे काय करणार? बॅंकेच्या कर्जाचे काय? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकलेले नाहीत.

आम्हाला फक्त १५ वर्षांसाठीच द्या : विक्रमसिंह शिंदे

आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रोला सुरू करण्यास काही अडचणी येत असतील तर तो आम्ही या हंगामातच सुरू करू. हा कारखाना विद्यमान संचालक मंडळाने आम्हाला फक्त 15 वर्षांसाठीच चालवण्यासाठी द्यावा. तत्काळ आम्ही हा कारखाना सुरू करून तालुक्यातील कमलाभवानी व आदिनाथ दोन्ही कारखाने चांगले चालवून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देऊ, असे कमलाभवानी रिफाइंड शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here