आणि ते मंगल झाले पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न :- राजकुमार घाडगे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

एचआयव्ही बाधित बालकांच्या जीवनात पालवी फुलवणाऱ्या मंगलताई शहा यांचा जीवन प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. मागील ४० वर्षापासून मंगलताईंच्या सेवा कार्याचा दीप अखंडपणे तेवत आहे. आज त्यांच्या सेवा कार्यावर आधारित ‘ आणि ते मंगल झाले ‘ हे पुस्तक दीपस्तंभा प्रमाणे प्रत्येकाला दिशादर्शक ठरेल. असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
येथील कर्मयोगी सभागृहात गुरुवारी (ता.२) आयोजित ‘आणि ते मंगल झाले’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, माजी आमदार प्रशांत परिचारक, कीर्तनकार ॲड.जयवंत महाराज बोधले, पुस्तकाच्या लेखिका ‘ जोहडकार ‘ सुरेखा शहा, पुस्तकाचे संपादक सीए पवन झंवर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माजी आमदार प्रशांत परिचारक आपल्या अध्यक्षीय मनोगतात पुढे म्हणाले, येथील ओसाड माळरानावर मंगलताईंनी एचआयव्ही बाधित बालकांचा पालवी प्रकल्प सुरू केला. त्यांच्या सेवा कार्याच्या वाटचालीचा मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे. तर कीर्तनकार ॲड.जयवंत महाराज बोधले म्हणाले, मंगलताईच्या नावातच ‘मंगल’ शब्द आहे. समाजाच्या दृष्टीने ‘अमंगळ’ असलेल्या वंचित घटकांना त्यांनी आपल्या सेवाकार्यातून मंगल केले आहे. त्यामुळेच ‘ आणि ते मंगल झाले’ हे पुस्तकाचे शीर्षक समर्पक आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे म्हणाले, एचआयव्ही बाधित बालकांसह निराधार महिला, वृद्ध, मनोरुग्ण यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे अनमोल कार्य मंगलताई करीत आहेत. आणि ते मंगल झाले हे पुस्तक म्हणजे या सर्वांच्या वेदनेचा हुंकार आहे. त्यांचा विलक्षण असा प्रेरणादायी जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिका सुरेखा शहा म्हणाल्या, मंगलताई यांचे असामान्य सामाजिक कार्य समाजाला माहित व्हावे यासाठीच हा लेखन प्रपंच मी केला आहे. मंगलताई शहा आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ‘जियो और जीने दो ‘ या उक्तीप्रमाणे समाजातील निराधार गरजू व्यक्तींची निरपेक्षपणे सेवा करणे हेच ध्येय ठेवून आजपर्यंत वाटचाल केली. या वाटचालीमध्ये समाजातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील लोकांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे पुस्तक त्याचेच प्रतीक आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, व्हाईस चेअरमन माधुरी जोशी, सर्व नूतन संचालक, पत्रकार अभय जोशी, मंदार लोहकरे, वीरेंद्र उत्पात, उत्तम अभंगराव, अमोल नागटिळक, सोलापूर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद, सदस्य ॲड.सुवर्णा कोकरे, प्रकाश ढेपे, राजेश शहा यांच्यासह पंढरीतील राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिंपल घाडगे यांनी तर सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले. आभार आशिष शहा यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here