पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग’ व ‘वर्ल्ड ऑफ ऑटोमेशन, पुणे‘ यांच्यात असलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत ‘इंडस्ट्रिअल ऑटोमेशन’ या विषयावर दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.
सध्याच्या युगात विविध कंपन्यांमध्ये ‘ऑटोमेशन‘ हा महत्वाचा भाग बनला आहे. हीच संकल्पना लक्षात घेऊन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तज्ञ म्हणून ‘वर्ल्ड ऑफ ऑटोमेशन’चे ऑटोमेशन प्रोजेक्ट इंजिनिअर नयन चौधरी हे होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. राजेश पाटील यांनी या कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. यामध्ये नयन चौधरी यांनी ऑटोमेशनचा इतिहास सांगताना ‘पीएलसी स्काडा’ हे तंत्रज्ञान ऑटोमेशनमध्ये कसे वापरता येते? यावर विस्तृत मार्गदर्शन केले. पीएलसी स्काडा चे असणारे फायदे तसेच भविष्यात त्याचा होणारा उपयोग यावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकला. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पीएलसी स्काडा कंपनी मध्ये कशी वापरली जाते हे ऑनलाईन प्रात्यक्षिक करून समजावून सांगितले. यामुळे ही संकल्पना विद्यार्थ्यांना अतिशय सहजरित्या समजली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प करत असताना या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होईल? हे ही समजावून सांगितले. या कार्यशाळेचे औचित्य साधून वर्ल्ड ऑफ ऑटोमेशनच्या संचालिका प्रियांका ओझा यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील जवळपास १५० विद्यार्थी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. प्रा. अनिल टेकळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.धनराज डफळे यांनी आभार मानले.