सोलापूर : आज दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांची मा. नगरविकास मंत्री, श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्यासमवेत व्ही.सी.व्दारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विषयासंदर्भात व महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध व विविध संवर्गातील रोजंदारी व बदली कामगारांना सेवेत कायम करणे, आरोग्य निरीक्षकांना शासन नियमाप्रमाणे भत्ते मिळणे, निलगार समाज तुळजापूर शहर धर्मशाळेच्या जागेबाबत तसेच शहरातील रस्ते, रिंग रोड, गुंठेवारी व इतर विविध विषयांसंदर्भात बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये सोलापूर शहर व विशेषत: हद्दवाढ भागातील बहुतांश भाग हा गुंठेवारी भागातून विकसित होत आहे. काही भागामंध्ये प्राथमिक रेखांकन मंजूर आहेत परंतू त्यास अंतिम घेण्यात आलेले नाही. मा. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांच्यावतीने गेल्या काही महिन्यापासून गुंठेवारी अधिनियामान्वये नियमितीकरणाचे बांधकाम परवानगी प्रकरणे व प्राथमिक रेखांकनातील बांधकाम परवानगीची प्रकरणे थांबविण्यात आलेली आहे. सदर प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यात यावीत.
सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या वाहन चालक हे अनेक वर्षापासून रोजंदारीवर काम करीत आहेत. सदर कामगाऱ्यांचे वय 54 ते 55 पेक्षा जास्त झाले असून आजतागायत त्यांना कायम न केल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उदरनिर्वाह करण्याकरीता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच सन 1995 नंतरच्या रोजंदारी कारकून, शिपाई, सफाई कामगार अश्या विविध पदावर गेल्या 30 वर्षापासून कर्मचारी कार्यरत आहेत. सोलापूर महानगरपालिकेने त्यांना आस्थपना यादीमध्ये समावेश करून देखील यांना कायम करण्यासंदर्भात् अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. सदर वाहन चालक व रोजंदारी कर्मचारी यांना तात्काळ कायम करणे अत्यंत आवश्यक असून मा. मंत्री महोदयांनी याबाबत मा. आयुक्त यांच्याकडून प्रस्ताव मागवून यांना कायम करण्याकरीता कार्यवाही करण्यात यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेकरीता 25 वर्षे सेवा झालेल्या सेवकांना योजनेचा लाभ मिळतो ही अट शिथिल करून सफाई कामगार हे घाणीमध्ये काम करीत असताना कर्मचाऱ्यांना अनेक शारीरीक व्याधी निर्माण होतात त्यामुळे वरील अट शिथिल करून 10 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळावा. लाड-पागे समिती 21 ऑक्टोंबर 2011 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना मिळावा, सन 1987 नुसार सफाई कामगारांचे राहते निवासस्थान त्यांना मालकी हक्काने मिळावे.
सोलापूर शहरातील निलगार ज्ञाती संस्था व इतर 6 संस्थांना नगरपरिषद तुळजापूर, जि. उस्मानाबाद अंतर्गत नगरपरिषदे मार्फत संपादीत केलेली जागा हस्तांतरीत करण्याकरीता नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम 1965 चे कलम 92 अन्वये मंजूरी देण्यात यावी.
सोलापूर शहरामध्ये 54 मीटर बायपास रोड महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेमधून मंजूर झालेल्या बाधित शेतकऱ्यांना भुसंपादनाची रक्कम देण्यात यावी.
वरील विषयांबाबत मा. नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, सोलापूर शहरातील गुंठेवारीचे अर्ज मा. आयुक्त यांनी येत्या 2 महिन्यांमध्ये निकाली काढावे, सोलापूर महानगरपालिकेतील कार्यरत असणारे सर्वच रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा. त्यांच्यावर तात्काळ निर्णय घेण्यात येईल. सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे सर्व विषय मार्गी लावण्यासंदर्भात संबंधित खाते प्रमुखांना आदेश देण्यात आले आहे. 54 मीटर बायपास रोड बाधित शेतकऱ्यांच्या रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याकरीता योग्य ती कार्यवाही करावी.
यावेळी गटनेता चेतन नरोटे, विरोधी पक्ष नेता अमोल शिेदे, नगरसेवक बाबा मिस्त्री, सोमपा कामगार संघटनेचे अशोक जानराव, बापू सदाफुले, सायमन गट्टू, बाली मंडेपू, गणेश डोंगरे, आरोग्य निरीक्षक संघटनेचे बाबासाहेब इंगळे, श्रीनिवास रामगल, योहान कानेपागुल, किसन गर्जे, व इतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.