सुंदर माझे कार्यालय अभियान अंतर्गत शासकीय कार्यालयाने कामकाजात गतिमानता  आणावी ए-विभागीय आयुक्त सौरभ राव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महसूल कार्यालय अंतर्गत असलेल्या सर्व प्रलंबित आस्थापनाविषयक बाबींचा निपटारा करण्यासाठी

माहे एप्रिल पासून विशेष मोहीम राबवावी.           

सोलापूर, दि.15(जिमाका):- सुंदर माझे कार्यालय अभियानात प्रत्येक शासकीय कार्यालयाने सहभाग नोंदविला पाहिजे. या अंतर्गत कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यासाठी उत्कृष्ट सोयी सुविधा निर्माण करून प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणावी व कार्यालयास भेट देणार्‍या नागरिकांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त सौरभ राव यांनी केले.

         नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित महसूल विभागाचा शक पूर्तता आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सौरभ राव बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महसूल उपायुक्त संतोष पाटील, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, हेमंत निकम, चारुशिला देशमुख, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार दत्तात्रय मोहोळ, नगरपालिका प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांच्यासह अन्य महसूलचे अधिकारी उपस्थित होते.

         विभागीय आयुक्त सौरभ राव पुढे म्हणाले की, सुंदर माझे कार्यालय उपक्रमाअंतर्गत कार्यालयाचे स्वरूप बदलून कामकाजात ही गतिमानता आली पाहिजे. तसेच येथे भेट देणाऱ्या नागरिकांचे समाधान ही झाले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने नागरिकांना देण्यात येणार्‍या सेवांच्या गुणवत्तेत बदल करावा. तसेच भेट देणाऱ्या नागरिकांना चांगला प्रतिसाद देऊन त्यांच्याशी संवाद साधावा व त्यांच्या मनामध्ये शासन व प्रशासनाबद्दल चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

       महाराजस्व अभियान अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक बाबीवर दक्ष राहून काम करावे. तसेच हे अभियान अधिक लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करावेत. यामध्ये कामाची गती वाढवावी, पारदर्शकता आणावी असे निर्देश आयुक्त श्री. राव यांनी दिले. तसेच प्रत्येक महसूल कार्यालयात प्रलंबित असलेल्या आस्थापना विषयक बाबीवर अधिक लक्ष देऊन त्या बाबीचा निपटारा करण्यासाठी माहे एप्रिल पासून विशेष मोहीम राबवावी. ही मोहीम पुणे विभागात सर्व जिल्ह्यात सुरु असून या मोहिमेत सोलापूर जिल्ह्याने अधिक प्राधान्याने भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सोलापूर महसूल प्रशासनाचे काम अत्यंत चांगले असून दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाने सुंदर माझे कार्यालयांतर्गत त्यांच्या कार्यालयाचा केलेला कायापालट हा कौतुकास्पद असून इतर महसूल कार्यालयांनी ही या अभियानात सहभाग घेऊन आप आपली कार्याये सुंदर करावीत व या कार्यालयातून नागरिकांना अधिक गतिमान सेवा उपलब्ध कराव्यात असे आवाहन श्री. राव यांनी केले. ही सर्व कामे करत असताना महसूलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मूळ महसूलचे कामाकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी निर्देशीत केले.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर महसूल विभाग अंतर्गत येत असलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत सादर केली तसेच आस्थापना विषयक प्रलंबित असलेल्या विविध बाबींचा निपटारा करण्यासाठी माहे एप्रिल मध्ये विशेष मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महसूल उपायुक्त संतोष पाटील यांनीही विविध बाबी विषयी मार्गदर्शन सूचना देऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.     

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शक पूर्तता अंतर्गत महसुल विभागाच्या प्रत्येक कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध बाबींची सविस्तर माहिती घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.

 सुंदर माझे कार्यालय चित्रफीत

सुंदर माझी कार्यालय अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाने सी एस आर फंड व लोकसहभागातून कार्यालयाचा केलेला कायापालट व त्यातून नागरिकांना देण्यात येत असलेल्या विविध सेवांची माहिती याबाबत माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दाखविण्यात आला. यावेळी श्री. राव यांनी या उपक्रमाचे कौतुक करून तहसीलदार अमोल कुंभार यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here