विठ्ठल रुक्मिणीप्रतीच्या सामान्य वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पंढरपूरच्या प्रश्नांवर लक्ष देणार : ना. डॉ नीलम गोऱ्हे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(मंदिर देवस्थान समितीने आज पुण्यात केला हृद्य सत्कार)

“पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीने भाविकांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना पांडुरंग – रुक्मिणीचे सुलभ दर्शन सोयीचे होणे महत्त्वाचे आहे. याकरिता लवकरात लवकर निधीच्या विनियोग प्रक्रियेबाबत योग्य ती कार्यवाही करावी. देवस्थान समितीने नगरपालिका, जिल्ह्यातील मान्यवर व्यक्ती, पत्रकार आणि भाविकासोबत नियमित संवाद सुरू करावा. यामुळे सर्वांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती उपाय योजना करणे शक्य होईल” अशा सूचना आज विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज पंढरपूर देवस्थान समितीला दिल्या.

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पंढरपूर देवस्थान विकासासाठी ७३ कोटी ८० लक्ष रुपयांचा निधी राज्य सरकारच्या वतीने मंजूर केला गेला. या निधीसाठी आणि मंदिर विकासासाठी डॉ. गोऱ्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज देवस्थान समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी आज डॉ. गोऱ्हे यांचा पुण्यातील निवासस्थानी जाऊन सत्कार केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर
समिती सदस्या माधवी निगडे, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील भाविकांची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पंढरपूर येथे भाविकांसाठी उद्यान, संतपीठ सुरू करणे आणि इतर अनुषंगिक सुविधा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करणार असल्याचे यावेळी डॉ गोऱ्हे यांनी सांगितले. आई – वडिलांच्या ममतेने विठ्ठल रुक्मिणी प्रती असलेल्या भावनेतून सर्वसामान्य वारकरी भक्तांच्या भावना लक्षात घेऊन पंढरपूर परिसरातील प्रश्नांवर काम करीत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here