विजयसिंह मोहिते-पाटील यांना अखेर उच्च न्यायालयाकडून न्याय!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विजयसिंह मोहिते-पाटील यांना अखेर उच्च न्यायालयाकडून न्याय!

(अकलूज- माळेवाडी नगरपरिषदेसाठी उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला आदेश)

सोलापूर // प्रतिनिधी

अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची लढाई मोहिते पाटील यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जिंकली आहे. गेल्या २६ दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाला फळ आले आहे. अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीचा अंतिम अध्यादेश तीन आठवड्यात काढून त्याबाबत कळवावे, असा आदेश उच्च न्यायालयाने आज (ता. १७ जुलै) राज्य सरकारला दिला. त्यामुळे अकलूज येथे नगरपरिषद, तर नातेपुते येथे नगरपंचायत होणार, हे आता निश्‍चित झाले आहे.

दरम्यान, अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर नगरपरिषदेसाठी गेल्या २६ दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणस्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाजपच्या नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा देत सरकारला टीका केली होती.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. एकीकडे आंदोलन, पाठपुरावा सुरू असताना दुसरीकडे न्यायालयीन लढाई सुरू होती. त्या माध्यमातून अखेर आज यश आले. हा निर्णय न होण्यामागे राष्ट्रवादी असल्याचा आरोप मोहिते पाटील गटाकडून होत हेाता. त्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून मोहिते पाटील गटाने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नगरपरिषद व नगरपंचायतचा अंतिम आदेश का काढला नाही? असा जाब उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला 7 जुलै रोजी विचारण्यात आला होता. याबाबतचे आपले म्हणणे शनिवारी (ता. 17 जुलै) सादर करण्यास सरकारला सांगितले होते. त्यानुसार आज सरकारच्या वतीने अधिकारी व सचिवांनी न्यायालयात सांगितले की, कागदोपत्री सर्व पूर्तता झालेली आहे. फक्त मंत्र्यांच्या सह्या होणे बाकी आहे. यावर ग्रामपंचायतीच्या वतीने ऍड. अभिजित कुलकर्णी यांनी या सह्या आठ दिवसांत करून पुढील कार्यवाही करावी, असा युक्तिवाद केला. मात्र, मंत्री पंढरपूर वारीच्या गडबडीत असल्याने न्यायालयाने सरकारला तीन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.

अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होण्यासाठी अकलूज-माळेवाडी व नातेपुते या तीनही गावच्या नागरिकांनी 2018 पासून प्रक्रिया सुरू केली आहे. सप्टेंबर 2019 रोजी पहिला अध्यादेश निघाला होता. अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायत व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने ऍड. अभिजित कुलकर्णी व शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ए. आय. पटेल हे युक्तीवाद केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here