लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्वाचा-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर दि.२५ (जि.मा.का):-भारतीय लोकशाही जगातील उत्तम लोकशाही व्यवस्था आहे. आपली लोकशाही मूल्ये जगासाठी आदर्श आहेत. लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक युवकांनी मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

                25  जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार  दिनानिमित्त  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, येथे आयोजित राष्ट्रीय मतदार  दिनाच्या कार्यक्रमात  जिल्हाधिकारी श्री.  शंभरकर बोलत होते. कार्यक्रमास कुलगुरु डॉ. श्रीमती मृणालिणी फडणवीस,  आयुक्त शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्र. कुलगुरु डॉ.राजेश गादेवार,  पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी, अधिकारी, कर्मचारी   उपस्थित होते.

              यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, लोकशाहीसाठी  पात्र नागरिकांचे मतदार यादीत नाव येणे गरजेचे आहे. देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे.  यासाठी युवक-युवतींनी जास्तीत-जास्त मतदार यादीत नाव नोंदणी करुन लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मतदार नोंदणी प्रक्रिया सुलभ झाली आहे.   लोकशाही व्यवस्था वृद्धींगत करण्याचे श्रेय मतदार नोंदणीसाठी उत्तम काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे. नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणुकीत मतदान करावे, तसेच पात्र मतदारांनी मतदार नोंदणी केली नसल्यास त्वरीत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

    समाजातील नागरिकांनी मतदान करावे. मतदानाने देशाचे व समाजाचे भविष्य घडणार आहे.  मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. उज्वल भारताच्या भविष्यासाठी मतदान नोंदणीत सहभाग घ्यावा असे, कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

             यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, समाजाचे प्रश्न सोडवून समाजाला दिशा देणारे नेतृत्व निवडण्यासाठी मतदान ही एकमेव महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. मतदारांनी निर्भयपणे व दबावाला बळी न पडता मतदान केल्यास लोकशाही समृद्ध करणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळेल.

    भारतीय संविधानाने मतदानाचा अमूल्य ठेवा दिला असून, तो बिनचूक बजवावा. लोकशाही प्रक्रिया सशक्त करण्यासाठी मतदार म्हणून सहभागी व्हावे.तसेच मतदान सुयोग्य उमेदवार दिले जाईल याची दक्षता मतदारांनी घ्यावी. असे महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी सगितले.

            यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे म्हणाले, जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून १ लाख ५९ हजार नवीन मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे जिओ मॅपिंग झाले असून, 50 टक्के आधार नोंदणी झाली आहे. तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थेचे चांगले सहकार्य लाभले असून  या नोंदणीत राज्यात सोलापूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी  पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मतदार नोंदणीत उत्तम कामगिरी करणाऱ्या नायब तहसीलदार आणि बीएलओंचा सत्कार करण्यात आला. मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. तसेच मतदार नोंदणी मोहिम विशेष प्रसिद्धीबाबत प्रसार माध्यम  प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ देण्यात आली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here