राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त सर्व कार्यालये, ग्रामपंचायतीमध्ये होणार एकावेळी शपथ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शपथ घ्यावी- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

            

सोलापूर,दि.19: मतदारांमध्ये जागृती यावी, नवीन मतदार नोंदणी व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो. यंदा या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात, ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाचे नियम पाळून एकावेळी शपथ घेण्यात येणार आहे. सामान्य नागरिक, 18 वर्षांवरील युवकांनी मतदार जागृतीची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 

राष्ट्रीय मतदार जागृती दिवसानिमित्त पूर्वतयारी आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी निवडणूक तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, नायब तहसीलदार अनिल निराळी यांच्यासह महानगरपालिका, शिक्षण विभाग, एनसीसीचे अधिकारी उपस्थित होते. 

            श्री. शंभरकर यांनी सांगितले की, मतदार जागृतीसाठी सर्व नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. नागरिकांनी, कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी मतदार जागृती होण्यासाठी शपथ घ्यावी. शपथ घेतलेला फोटो, व्हिडीओ निवडणूक विभागाने दिलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरला लिंक करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

कोरोनाचे नियम पाळून एनसीसी कॅडेटनी शपथ घ्यावी, नागरिकांना शपथ घेण्यास प्रवृत्त करावे. मतदान नोंदणीबद्दल जागृती करावी. मनपा आणि इतर शाळांनी वक्तृत्व, निबंध स्पर्धा ऑनलाईन घ्याव्यात. लोकशाहीला बळकट करण्यासाठी 18 वर्षांवरील युवकांनी मतदार यादीत नोंदणी करावी. ही प्रक्रिया सुलभ आहे. आयकॉन व्यक्तींचा वापर करून मतदार दिनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी संबंधितांना दिल्या. 

            याशिवाय विविध सामाजिक संघटना, संस्था, विभाग यांनीही राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घ्यावी. शपथ घेतलेला कार्यक्रम हा सोशल मीडियावर अपलोड करावा. 

एनसीसी कॅडेटनी लसीकरणास करावी मदत

            जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. कोरोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, मात्र काही नागरिक लस घेत नाहीत. त्यांना प्रवृत्त करण्यासाठी एनसीसी कॅडेटनी मदत करावी. प्रत्येक कॅडेटनी चार-पाच नागरिकांना प्रवृत्त केल्यास लसीकरणाला हातभार लागणार आहे, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

शपथ

            “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशागी परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.”

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here