राज्यातील साखर उद्योगाला नवीन उभारीसाठी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!
राज्यातील साखर उद्योगावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढून भाजपने स्वत:ची ताकद या क्षेत्रात उभी करण्यावर भर दिला आहे. राज्यातील साखर उद्योगांच्या प्रश्नांवर केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे मंगळवारी झालेली बैठक पार पडली. राज्यातील साखर उद्योगाला विविध योजनेअंतर्गत मोठी मदत मिळणार आहे.
करोना आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना अर्थसहाय्य, निर्यातीच्या कोट्यात वाढ, थकित कर्जाची फेररचना, इथेनाॅल प्रकल्प उभारण्याकरिता मदत अशा विविध मागण्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अमित शहा यांच्याकडे असलेले सहकार खाते या माध्यमातून साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यास शिंदे-फडणवीस यांनी नवी दिल्लीत शहा यांची भेट घेतली. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील, रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार धनंजय महाडिक आदी सारी सहकार व साखर कारखानदारीतील मंडळी उपस्थित होती.
पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगाला भरीव मदत करून या भागात आपली ताकद वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.