आपल्या देशात अशा महान विभुती जन्माला आल्या की ज्यांच्यामुळे जनमाणसाला विचाराची नवी दिशा मिळाली त्यामुळे समाज बदलला, नवी शिकवण अंगीकारली, नव्याची कास धरली, स्त्रियांचा सन्मान व सहभाग वाढला या महान व्यक्तींपैकी एक थोर समाज सुधारक म्हणजे राजा राममोहन रॉय होत. राजा राममोहन रॉय यांनी आधुनिक भारताची सुरुवात केली, त्यांच्या कार्यामुळे भारतात एकोणिसाव्या शतकात धर्मसुधारणेची चळवळ सुरू झाली. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणत होते. असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले. आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250 वी जयंती निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालय सोलापूर व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘महिला सक्षमीकरण जनजागृती रॅली’च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले, या प्रसंगी मार्गदर्शन करताना तहसिलदार अंजली मरोड म्हणाल्या की आजची पिढी मोबाईल पाहण्यात गुतली आहे त्यामुळै डोळयावर विपरीत परिणाम होत आहे ग्रंथ वाचनाने बुध्दीला प्रेरणा मिळते म्हणून वाचल तर वाचाल असा संदेश दिला.
या प्रसंगी बोलताना डॅा.कविता मुरूमकर म्हणाल्या की, राजा राममोहन रॉय हे एक महान ऐतिहासीक विद्वान म्हणुन ओळखले जातात, ज्यांनी भारताला आधुनिक भारतात बदलण्याकरता बराच संघर्ष केला आणि पिढयानपिढयापासुन चालत आलेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचे कार्य केले. समाजात परिवर्तन घडवण्याकरता त्यांनी बरेच समाज उपयोगी कार्य केले आपल्या देशात महिलांची स्थिती मजबुत बनवण्यात त्यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. रॉय यांनी सती प्रथे विरूध्द कडाडुन विरोध केला, ते एक महान विव्दान होते, ज्यांनी ब-याच पुस्तकांचे भाषांतर केले होते.
सती,जातीभेद आदी अनिष्ट प्रथाविरूद्ध लढा दिला. राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या अनिष्ट प्रवृत्ती विरुद्ध जोरदार आवाज उठवला, ही प्रथा कायद्याने बंद होईल म्हणून यशस्वी प्रयत्न केले, त्यामुळे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा आणला.
अध्यक्षीय समारोप करताना माजी महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या की महिलांनी स्वत:च्या पायावर ऊभे राहण्यासाठी निर्भयपणे काम करण्याची गरज आहे. सर्वांगीन प्रगतीसाठी प्रबोधन करण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. महिलांनी सक्षमीकरणासाठी स्वत:च तयार झाले पाहिजे इतरांच्या मदतीची अपेक्षा नको असे म्हणून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीत हरिभाई देवकरण प्रशाला, सिध्देश्वर प्रशाला, निर्मलताई ठोकळ प्रशाला, ज्ञानप्रबोधीनी प्रशाला, बालवीर सार्वजनिक वाचनालय ग्रंथ दिंडी पथक, इत्यांदिंनी सहभाग नोंदवून चौका-चौकात प्रबोधनात्मक प्रात्यक्षिके करुन घोष फलकाव्दारे तसेच मुलींच्या झांज व ढोल पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. हरिभाई देवकरण प्रशालेपासून मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ दिंडीसह रॅलीची सुरवात करण्यात आली ही रॅली डफीरन चौक, महानगर पालिका, डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक, निर्मलकुमार फडकूले सभागृह, सिध्देश्वर मंदिर, होम मैदान व पुन्हा हरिभाई देवकरण प्रशालेत समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमात हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रा. श्रीकांत येळेगावंकर, माहिती व प्रसार केंद्रीय कार्यालयाचे अंबादास यादव, हरिभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक हणुमंत मोतीबणे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, पांडुरंग सुरवसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रकाश शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन सोलापूर जिल्हा ग्रंथालयाचे निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी विदयार्थ्यी व सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे प्रदिप गाडे व ग्रंथालय कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.