योग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

योग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते

करकंब मध्ये ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’चे उदघाटन संपन्न

‘एक तर ग्रामीण भागातील स्त्री ही लांब अंतरावर जाण्यास टाळते आणि जवळ कुठे असेल तर स्त्री डॉक्टरलाच आपल्या आजाराबद्दल संपुर्ण माहिती सांगत असते. त्यामुळे महिला डॉक्टर असल्याने आपलेपणा वाढतो आणि योग्य संवादाने विचारांची चांगल्या पद्धतीने देवाण घेवाण होते व योग्य निदान झाल्याने ती लवकर बरी होते. त्यामुळे करकंब सारख्या ग्रामीण भागांत क्लिनिक उभारणे ही अभिनंदनीय गोष्ट आहे. स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे या वैद्यकीय क्षेत्रात नक्कीच यश खेचून आणतील. डॉक्टरांनी वेळोवेळी अपडेट राहण्याची आवश्यकता असून आजार आणि उपचार यांची सांगड घातली पाहिजे. डॉक्टरांनी पैशाच्या मागे न लागता आपले लक्ष उपचार करण्यावर केंद्रित केले पाहिजे. उपचार व्यवस्थित झाल्यावर आपोआप पैसा मागे लागतो. डॉ. रोंगे सरांनी खर्डी सारख्या ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षणाचे साम्राज्य उभे केले. यशस्वी होण्यासाठी डॉ. रोंगे सरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण वाटचाल करावी.’ असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते यांनी केले.

करकंबमध्ये पंढरपूर–करकंब रोड लगत असलेल्या महावितरण कार्यालयासमोर आज ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’चे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.श्रीकांत देवकते मार्गदर्शन करत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या केइएम मधून एमबीबीएस, दिल्लीच्या एमएएमसी मधून एमडी तर पॉंडीचेरीच्या जेआयपीएमइआर मधून डीएम कार्डिओलॉजी असे उच्च शिक्षण घेतलेले आणि सध्या सोलापूर येथील गंगामाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सेवा बजावत असलेले डॉ. प्रमोद निवृत्ती पवार हे होते. प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘करकंब ग्रामस्थांच्या मागणीनुसार प्रा.सुरज रोंगे आणि डॉ.स्नेहा रोंगे यांच्या इच्छेनुसार या हॉस्पिटलला ‘डॉ. बी.पी. रोंगे क्लिनिक’ हे नाव दिले असून ग्रामीण भागातील सध्याची अवस्था व उपचारासाठी होणारी स्त्रियांची धावपळ याचा विचार करून करकंबमध्ये दवाखाना स्थापन केला. गरिबांसाठी परवडेल अशा अल्प दरात सेवा देण्याचा मानस आहे. डॉ.स्नेहा रोंगे ह्या स्वतः एमबीबीएस, एमएस (ओबीजीवाय)असून त्यांनी पुणे येथे शिक्षण घेतले असून पुण्याच्या प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याच्या हेतूने करकंबमध्ये प्रथमच लॅप्रोस्कोपी एक्सपर्ट व इन्फर्टीलिटी स्पेशालिस्ट ची सोय स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.’ ‘डॉ. बी.पी. रोंगे क्लिनिक’च्या सर्वेसर्वा डॉ. स्नेहा रोंगे म्हणाल्या की, ‘सध्या हे प्राथमिक स्वरूपात ओपीडी सेंटर उघडलेले असून पुढे जाऊन महिला रुग्णांसाठी मोठ्या सुविधा देणार आहोत जेणेकरून त्यांना आजार बरा होण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही व त्रास होणार नाही. माफक दरात जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट कशी मिळेल याकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. ग्रामीण भागातील महिलांबरोबर त्यांच्या आजारासंबंधी चर्चा- विनिमय करून,योग्य उपचाराच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे काम करणार आहे.’ असे आश्वासन यावेळी डॉ. स्नेहा रोंगे यांनी दिले. निवृत्त शिक्षक सुभाष हत्तरगे म्हणाले की, ‘करकंबमध्ये स्त्रीरोग तज्ञ असावेत अशी खुप दिवसापासुन इच्छा होती. त्यामुळे आता डॉ. स्नेहा रोंगे यांच्या रुपात करकंब व आसपासच्या ग्रामीण भागातील स्त्रियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आजकाल आजाराची वेळ सांगून येत नाही. त्यासाठी डॉक्टरांनी सातत्याने सेवा दिली पाहिजे.’ अशी अपेक्षा व्यक्त केली. जि.प. सदस्या रजनीताई देशमुख म्हणाल्या की, ‘ ग्रामीण भागातील महिला उपचारासाठी मोठ्या शहरात जात नाहीत त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत जाते. यामुळे महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी सात महिलांमध्ये कॅन्सरचा आजार दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्टर पुरुष असेल तर त्यांना होणारा त्रास लाजून सविस्तरपणे सांगता येत नाही. कालांतराने धोका वाढत जातो. त्यामुळे महिलांच्या वतीने मी डॉ. स्नेहा रोंगे यांचे आभार मानते. त्यांच्या माध्यमातून महिलांमधील आजार कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. यासाठी आता सोलापूर, पंढरपूर, पुणे मुंबई येथे जाण्याची गरज भासणार नाही.’ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ.निशिगंधा माळी-कोल्हे म्हणाल्या की, ‘ग्रामीण भागात स्त्री रोग तज्ञाची गरज होती ती आता पूर्ण झाली असून कॅन्सर तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे यांनी आता समाजसेवेचा वसा उचलला असून त्यांनी करकंब बरोबरच मोडनिंबमध्ये देखील येऊन महिला ग्रामस्थांच्या सेवेसाठी वेळ द्यावा. त्यासाठी मी आत्ताच निमंत्रण देते.’ प्रा. सतीश देशमुख म्हणाले की, ‘करकंबमधील आजारी स्त्री आता लवकर बरी होऊन घरी परतेल. म्हणून याठिकाणी स्त्री रोग तज्ञाची आवश्यकता होती. आता ती ही पूर्ण झाली आहे. विज्ञानयुग आहे, मेंदू तल्लख हवा, पण हृदयाच्या गाभार्‍यात भावना शिल्लक ठेवा.’ असे सांगून त्यांनी ‘शिक्षण क्षेत्रातील यश आता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात देखील मिळवावे.’ यासाठी शुभेच्छा दिल्या. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे म्हणाले की, ‘आता पंढरपूर क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी उत्तुंग यश मिळवले त्याप्रमाणेच करकंबमध्ये त्यांनी गोरगरिबांची समाजसेवा करून उपचार करून महिलांचे प्रश्न सोडवून वैद्यकीय क्षेत्रात देखील यश मिळवावे. सोलापूर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले की, ‘जिद्द बाळगली तर काय होते हे स्वेरीकडे पाहिल्यास समजून येते. एक तर सरळ मार्गाने जाणाऱ्याला अडथळा येत नाही आणि चुकून आलाच तर अडथळा पार करूनही ते पुढे जात असतात. कोरोना काळात डॉक्टरांनी देवदुताची भूमिका बजावली.
त्यामुळे आता शुभेच्छा देण्यास हरकत नाही. पुढची पिढी चांगली काम करेल असा विश्वास वाटतो. स्त्री डॉक्टरांची सध्या करकंबमध्ये गरज होती आता ती गरज पूर्ण केल्याबद्दल डॉ. स्नेहा रोंगे मॅडम यांचे आभार.’ प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.प्रमोद पवार म्हणाले की, ‘डॉ.रोंगे सरांनी ज्याप्रमाणे स्वेरीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात प्रचंड उत्तुंग झेप घेतलेली आहे त्याप्रमाणे डॉ.स्नेहा रोंगे यांनी देखील वैद्यकीय क्षेत्रात आता पाऊल टाकले आहे. त्या ही स्वेरीप्रमाणे रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करतील. डॉ.स्नेहा रोंगे यांनी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आजारासंबंधी व त्यांच्या समस्येसंबंधी सर्व अडीअडचणी दूर कराव्यात.’

यावेळी डॉ.स्नेहा रोंगे यांना आलेल्या पाहुण्यांकडून आरोग्य देवतेची मूर्ती भेट देण्यात आली. यावेळी करकंबचे सरपंच तेजमाला पांढरे, उपसरपंच आदिनाथ देशमुख, करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि प्रशांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, भाजपाच्या जिल्हा सचिव सौ. वंदना पंत, दामाजी महाविद्यालय मंगळवेढ्याचे प्राचार्य डॉ.एन.बी.पवार, मा. जि.प. सदस्य बाळासाहेब माळी, युवा आघाडीचे नितीन बागल, स्वाभिमानी संघटनेचे पांडुरंग नाईकनवरे, सुभाष गुळवे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत, ग्रा.सदस्या कल्पना देशमुख, ग्रा.पं. सदस्या वैशाली देशमुख, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नगरकर, निवृत्त पोलीस उपअधिक्षक रघुनाथ जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील झिरपे, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव पांडुरंग व्यवहारे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण वंजारी, डॉ.तुषार सरवदे, कनकंबा मिल्कचे सतीश खारे, डॉ.नवनाथ आलेकर, अभिषेक पुरवत, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष महेश व्यवहारे, कृ.उ.बा.समितीचे संचालक कैलास खुळे, मिलिंद उकरंडे, जयवंत पेट्रोलियमचे काशीद, दत्ता शिंदे, राहुल शिंगटे, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष अमोल शेळके, डॉ.नितीन खाडे, संतोष पिंपळे, मा. ग्रा. पं. सदस्य सचिन शिंदे, अरुण बनकर, रामदास माने, रमेश खारे, इलेक्ट्रिकल सुपरवायझर संतोष जाधव आणि करकंब परिसरातील वैद्यकीय, शिक्षण, क्रीडा, राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित केले होते. मास्क, सेनिटायझर आणि दोघांमध्ये योग्य अंतर राहील याची पुरेपूर दक्षता घेतली होती. करकंबसारख्या ग्रामीण भागात केवळ उपचाराअभावी रुग्णांचे नुकसान झाले असून आता ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’ च्या माध्यमातून स्त्री रुग्णांवर प्राथमिक उपचाराची सोय झाल्यामुळे करकंब भागात समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे दिसून आले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. विश्वासराव मोरे यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here