कचरेवाडी तालुका मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. सदरच्या ऊस बिलाची रक्कम ही ऊस उत्पादक यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. याविषयी बोलताना परिचारक म्हणाले की गळीत हंगाम २२-२३ मध्ये उसाची उपलब्धता चांगली आहे. युटोपियन शुगर्स कडे पहिल्या पंधरवड्याचे अखेर गाळप झालेल्या ऊसाचे बिल आम्ही देत असून कारखान्याने या पूर्वीच जाहीर केल्या नुसार ऊसाच्या ८६०३२ या जातीस १०० रु. जास्तीचा दर देण्याच्या उद्देशाने प्रती मे.टन २४०० रु. प्रमाणे तर को- २६५ या जातीच्या ऊसास प्रती मे.टन २३०० रु प्रमाणे ऊस बिलाचा पहिला हप्ता देत असल्याची माहिती ही परिचारक यांनी दिली.
युटोपीयन शुगर्स सध्या प्रती दिन ५२०० मे.टन या गाळप क्षमतेने चालू असून कारखान्यास चालू गळीत हंगामात विक्रमी गाळप होण्याची अपेक्षा आहे. त्या नुसार कारखान्याची सर्व यंत्रणा कार्यरत आहे.