मोहोळ येथे युवकावर प्राणघातक हल्ला!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ येथे युवकावर प्राणघातक हल्ला!

सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपीला सोडविण्यासाठी मदत का करतोस, असे म्हणून 7 जणांनी तलवार, लोखंडी गज आणि काठीने एका युवकावर प्राणघातक हल्ला केला. नवनाथ दगडू गायकवाड (रा. संत पेठ, पंढरपूर) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता सोलापूर-पुणे महामार्गावर हॉटेल पराग जवळ घडली. या प्रकरणी १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मोहोळ पोलिसात एका वकिलासह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास बनसोडे, ऍड. विनोद कांबळे, राहुल उर्फ दादा क्षीरसागर, बाळू क्षीरसागर, ऋषी क्षीरसागर, चिम्या बनसोडे, भैय्या क्षीरसागर (सर्व रा. सिद्धार्थ नगर, मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नवनाथ दगडू गायकवाड (रा. संत पेठ पंढरपूर) आणि मोहोळ येथील शिवसैनिकाच्या दुहेरी खून प्रकरणात अटकेत असलेले संतोष सुरवसे व रोहित फडतरे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. संतोष सुरवसे व रोहित फडतरे यांची जेलमधून सुटका व्हावी यासाठी नवनाथ गायकवाड हा प्रयत्न करीत आहे. यामुळे वरील सात लोक त्याच्यावर चिडून होते.

मोहोळ येथील शिवसैनिक सतीश शिरसागर व विजय सरवदे या दोघांच्या खून प्रकरणे मोहोळ पोलिसात १५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता त्या गुन्ह्यातील फिर्यादी व त्याच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्हीही गुन्ह्याला राजकीय वास येत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

१६ सप्टेंबर रोजी नवनाथ गायकवाड हा पंढरपूरला जाण्यासाठी मोहोळच्या बस स्थानकाच्या गेटवर बसची वाट पाहत थांबला होता. त्यानंतर तो लघुशंकेसाठी सोलापूर-पुणे महामार्गावर गेला होता. यावेळी सहा ते सात लोक हातात काठ्या लोखंडी गज व तलवार घेऊन त्याच्या दिशेने येऊ लागल्याने तो पुणे रोडने पुढे पळू लागला. मात्र पराग हॉटेलच्या अलीकडे या 7 लोकांनी त्याला घेराव घालून, “संतोष सुरवसे व रोहित फडतरे यांच्या सोबत का फिरत होता, त्यांनी आमच्या गल्लीतील दोघांचा खून केला आहे, तू त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत का करतोस” असे म्हणून त्याच्यावर तलवार, लोखंडी गज व काठीने हल्ला करून गंभीर जखमी केले.

यावेळी हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. यावेळी एक चार चाकी वाहन आल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर नवनाथ गायकवाड यांच्या मित्राने त्यास उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नवनाथ गायकवाड याने मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सात जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती होतात संशयित आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here