महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला

सोलापूर // प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेसह इतर पक्षातील विद्यमान 14 ते 15 नगरसेवक सोबत येतील. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत (municipal elections) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किमान निवडणुकीत 35 ते 40 नगरसेवक निवडून आणतो, असा विश्वास महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.15) पुण्यात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोठेंच्याच विषयावर बैठक बोलवण्यात आली आहे,

कॉंग्रेस सोडून कोठे यांनी शिवसेनेचे धनुष्य उचलले. मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी स्वतःची ताकद दाखवत महापालिकेत शिवसेनेला सत्तेच्या जवळ नेऊन ठेवले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना विधानसभेची संधी मिळेल, असा विश्वास होता. मात्र, पक्षांतर्गत कुरघोडीमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत ‘शहर मध्य’मधून बंडखोरी केली. या निवडणुकीनंतर कोठे यांना पक्षांतर्गत विरोध वाढला. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनीही निवडणुकीत त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला. परंतु, राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी असल्याने त्यांच्या प्रवेशाला ब्रेक लागला.

शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोठे यांना विचार करण्यासाठी वेळ दिला. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची चर्चाही झाली. मात्र, त्यांनी शिवसेनेत राहण्याची मनस्थिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चित झाला. आता पुण्यातील बैठकीवेळी कोठेंच्याबद्दल शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नेमके काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी पक्षाकडून भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, संतोष पवार, जुबेर बागवान, सुनिता रोटे, किसन जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनाही निरोप दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, कोठे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या ‘एमआयएम’ नगरसेवकांच्या ताकदीवर महापालिकेत प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महापौर दिसू शकतो, असा पक्षश्रेष्ठीला विश्वास वाटत आहे.
महेश कोठे यांच्या ताकदीवर व त्यांच्या सहकार्यातून बरेच नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे कोठे यांना मानणारे काही नगरसेवक आहेत. यापैकी उमेश गायकवाड, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, विठ्ठल कोटा, कुमूद अंकाराम, सावित्री सामल, मीरा गुर्रम, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि स्विकृत नगरसेवक शशिकांत कंची हे सर्वजण कोठे यांच्यासोबत महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. मात्र, यापैकी प्रत्यक्षात किती नगरसेवक पक्षांतर करणार याचीही उत्सुकता आहे.
कोठे यांच्या पक्षांतरानंतर शिवसेनेची शहरातील पकड ढिली होण्याची शक्‍यता असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते उर्वरित नगरसेवकांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही चर्चा आहे. त्यामध्ये मंदाकिनी पवार, ज्योती खटके, वत्सला बरगंडे यांच्या कुटुंबातील सदस्य, भारतसिंग बडुरवाले, अनिता मगर व राजकुमार हंचाटे यांचा समावेश असल्याचीही चर्चा आहे. या सर्वांना विजयाची खात्री देऊन निवडणुकीचा खर्चही पक्षातर्फे केला जाईल, असे आश्वासन दिले जात असल्याचीही चर्चा सुरू आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. विधान परिषदेसाठी लोकप्रतिनिधी निवडताना महापालिकेच्या नगरसेवकांनाही मतदानाचा अधिकार आहे. या निवडणुकीत मोठी आर्थिक देवाण-घेवाण होते अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. आता पक्षांतर केल्यास महापालिकेतून विकास कामांसाठी भांडवली निधीही मिळणार नाही आणि विधान परिषदेला मतदानही करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे पक्षांतर हे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अथवा महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होऊ शकते, अशीही चर्चा आहे. तर महेश कोठे यांच्यासोबत शिवसेनेतील काही नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये गेल्यास आगामी निवडणुकांपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये फुट पडण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here