मराठी भाषेचे सामर्थ्य टिकविण्यासाठी अधिक प्रयत्न आवश्यक – प्रा. शिवाजीराव देशमुख यांचे प्रतिपादन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि.28 (जिमाका): जागतिक पातळीवर मराठी भाषा सर्वात जास्त बोलली जाणारी 20 व्या क्रमांकाची भाषा आहे. सातवाहन काळापासून या भाषेचे अस्तित्व आहे. सर्वांना आनंद देणारी, संस्कारक्षम माणूस घडविणारी मराठी भाषा आहे. यामुळे या भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवा. मराठी भाषेचे सामर्थ्य टिकविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी केले.

            मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावर गुगल मीटद्वारे आयोजित व्याख्यानात प्रा. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, माहिती सहायक धोंडिराम अर्जुन, लिपीक प्रदीप गाडे उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव ऑनलाईन उपस्थित होते.

प्रा. देशमुख यांनी सांगितले की, मराठी भाषेतून लेखन केल्याने राज्यातील चार साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटले, ही गौरवाची बाब आहे. वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या काळापासून मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेरा कोटी लोक मराठी भाषा बोलत आहेत. दैनंदिन वापरात ही भाषा वापरले जात आहे. त्यामुळे मराठीची उपेक्षा होत नाही. मराठी भाषा हीच संस्कारक्षम माणूस घडवण्यासाठी उपयोगी पडत आहे. ज्या भाषेची उपयुक्तता असते ती भाषा नेहमीच वाढत राहते व आपली मराठी भाषा ही त्याच पद्धतीने वाढत आहे. ती ज्ञानभाषा होईल व मराठी भाषा टिकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            इतर अनेक भाषांतील शब्द आपल्यात समाविष्ट करून मूळ भाषा अधिक समृद्ध होत जातात. ऑक्सफर्ड डिक्शनरीने मराठी भाषेतील किमान पंधराशे शब्द जसेच्या तसे स्वीकारले आहेत. यामुळेच इंग्रजी भाषा अधिक समृद्ध झाली आहे. या  पद्धतीनेच मराठी भाषेमध्ये प्राचीन काळापासून संस्कृत, उर्दू ,पारशी व इंग्रजी या भाषेचे अनेक शब्द आले असून दैनंदिन वापरात लोक परकीय भाषेतून आलेले हे शब्द जसेच्या तसे वापरत आहेत.  आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी मराठी भाषेतील प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे सर्व प्रकारचे साहित्य बोलीभाषेसह ई-बुकच्या माध्यमातून सहज व सुलभ पद्धतीने वाचकांना उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले.

            अध्यक्षीय भाषणात श्री.सोनटक्के म्हणाले की, राज्य शासन मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करत असून प्राचीन काळापासून मराठी भाषेत ग्रंथ व साहित्य निर्मिती होत आलेली आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्य शासनाच्या व मराठीतील सर्व साहित्यिक व ग्रंथप्रेमी नागरिकांच्या प्रयत्नाला लवकरच यश येऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मराठी भाषेचा सर्व मराठी नागरिकांनी आपल्या दैनंदिन वापरात अधिकाधिक वापर करावा. आपण स्वतःहून पुढाकार घेऊन मराठी भाषा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री. पाटील यांनी केले तर व्याख्याते यांचा परिचय श्री अर्जुन यांनी करून दिला. श्री गाडे यांनी आभार मानले. ऑनलाईन वेबीनारला  रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here