मंगळवेढ्यात उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी पकडला बनावट दारूचा साठा जप्त!
(तब्बल लाख ५०हजार दोनशे तीस किंमतीचा मुद्देमाल जप्त)
राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने २५ एप्रिल रोजी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी गावात केलेल्या कारवाईत बनावट विदेशी दारुच्या साठ्यासह एक कार व मोटरसायकल जप्त केली.
सविस्तर वृत्त असे की, निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग यांच्या पथकाने २५ एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार शिरनांदगी, ता. मंगळवेढा जि. सोलापूर या गावाच्या हद्दीत एका विना परवाना विदेशी दारु विक्री केंद्रावर अचानक छापा टाकून तिथे बनावट विदेशी मद्य सापडल्याने तेथील आरोपीस अटक करून त्याच्याकडून पुढील माहितीनुसार येळवी ता.जत जि. सांगली या ठिकाणी जाऊन मारुती अल्टो कार क्र. MH 12 EM 2092 व एक हिरो होंडा पॅशन दुचाकी क्र. MH 05 AL ११९७ सह इंम्पिरियल ब्ल्यू विदेशी दारुच्या १पेट्या व मॅकडॉवेल नंबर १ दारुच्या १० पेट्या, ६२५ बनावट बुचे, विदेशी मद्याचा कलर (कॅरॅमल) २ लिटर, तयार विदेशी मद्य २० लिटर व ॲड्रियल व्हिस्कीच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या असा एकूण रु. ३ लाख ५०हजार दोनशे तीस किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून १) संदीपान भास्कर लांडगे रा. शिरनांदगी ता. मंगळवेढा २) बापु विष्णु आटपाडकर रा. येळवी ता.जत जि. सांगली यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक, संदिप कदम, दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे, सहायक दुय्यम निरिक्षक रवी पवार, जवान तानाजी जाधव, तानाजी काळे व अशोक माळी यांनी सहभाग घेतला आहे.
दि.२६ एप्रिल रोजी एका अन्य कारवाईत भरारी पथकाचे निरिक्षक सुनिल कदम व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवर पाळत ठेवून आकाश रवि चव्हाण, वय २५ वर्षे, रा. मुळेगाव तांडा याला तीन चाकी टेंपो क्र. MH-13 AN 8650 या वाहनातून रबरी ट्यूबमध्ये ४५० लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना पकडले. त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किंमतीसह ९८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागात विशेष तपासणी नाके उभारण्यात आले असून वाहनांची तपासणी व धाबे होटेल्सची तपासणी करण्यात येत आहे. तसेच गोवा राज्यातून तस्करी होणा-या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. सर्व नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधणेबाबत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितिन धार्मिक यांनी आवाहन केले आहे.