फॅबटेकमध्ये अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय चर्चासत्र व प्रदर्शन उत्साहात संपन्न: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या शात्रज्ञांनी साधला विद्यार्थी व प्राध्यापकांशी सुसंवाद
सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस सांगोला येथे न्युक्लियर सायन्स आणि टेक्नॉलॉजी (NSTSE-२०२२ ) यावरती राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र आयोजित केले होते. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (BARC) मुंबई येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर के सिंग, डॉ. पी सी सरोज, डॉ. ललीत वार्सणे, डॉ. अजय देशमुख यांचा सत्कार संस्थेचे चेरमन श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थी,शिक्षक व शेतकऱ्यांना अणुविज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची माहिती व जनजागृती व्हावी हा उद्देश समोर ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास ३ ते ४ हजार विद्यार्थी व शिक्षक आसपासच्या शाळा आणि महाविद्यालयामधून या चर्चासत्रासाठी आणि प्रदर्शनाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना शास्त्रज्ञ डॉ. आर के सिंग म्हणाले कि, अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानावरील चर्चासत्र व प्रदर्शन घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण होते, तसेच केलेले संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे व त्यातून उद्योजक निर्माण करणे हा यामागील प्रमुख हेतू आहे.याबरोबरच आज अनेक क्षेत्रामध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या शात्रज्ञांनी लावलेल्या संशोधनातून अनेक समाजउपयोगी संशोधन केले आहे.अणूचा उपयोग अणुऊर्जा तयार करणे,रेडिएशनच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून ते प्रिझर्व करणे,नवनवीन बियाणे बनविणे,फळांवर प्रक्रिया करणे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सारख्या रोगावर निदान करण्यासाठी रेडिएशनच्या माध्यमातून उपचार करणे. अशा अनेक प्रकारे याचा उपयोग समाजातील विविध घटकांना होत असतो.विद्यार्थ्यांनी देखील आपले शिक्षण पूर्ण करून संशोधनाकडे वळावे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
श्री अभिजित टिल्लू यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले कि, असे अनेक राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर सतत घेत असते. आज फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या माध्यमातून या अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय चर्चासत्र व प्रदर्शनास उपस्थित राहिलात हा तुमच्यासाठी एक प्रेरणादायी क्षण आहे. मुलींची उपस्थिती पाहता आजकाल मुलीसुद्धा याक्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.
डॉ. ललीत वार्सणे यांनी शिक्षण, उद्योग आणि उद्योजकता हे महत्वाचे तीन स्तर विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे, यामुळे देशाची आर्थिक भरभराट होते असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी अणुसंशोधनाच्या माध्यमातून आतापर्यंत ४० ते ५० प्रकारच्या बियाण्यांची निर्मिती केली आहे. तसेच कृषी क्षेत्रात विकास करणे त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी अणुसंशोधनामध्ये करिअर निर्माण करावे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
डॉ. अजय देशमुख यांनी फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च आणि भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या शात्रज्ञांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अणुसंशोधन विषयीचे कार्य व ते कसे चालते याचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी कशाप्रकारे केला जातो याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच डाळिंब उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या सांगोलासारख्या तसेच रस्ते महामार्गानी व लोहमार्गाने व्याप्त अशा भागात डाळिंब निर्यात करताना रेडिएशनच्या माध्यमातून प्रक्रिया करून ते प्रिझर्व करणे व ते निर्यात करणे असे उद्योग उभारण्याकरिता केंद्रशासन अनुदान देत असते अशीही माहिती यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली.
या प्रदर्शनामध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञांची माहिती पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जात होती. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (BARC) मुंबई येथून आणलेले अनेक प्रायोगिक मॉडेल्स व ते कसे कार्य करते याबद्दलची माहिती विद्यार्थी घेत होते.सांगोला तालुक्यात प्रथमच असा मोठा कार्यक्रम संपन्न झाला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या, टेक्निकल कोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर, स्टाफ या सर्व बाबी पाहून भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या शात्रज्ञांनी या ठिकाणी असा कार्यक्रम घेण्यास मान्यता दिली आहे.असे अनेक विद्यार्थीभिमुख उपक्रम याठिकाणी भविष्यात घेणार असल्याचा मानस संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी फॅबटेकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागातील अंतिम वर्षात शिकत असणारा विद्यार्थी संपतराव हाके यांना ‘गवास’ या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये १२ लाखाचे पॅकेज मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच स्नेहल मिसाळ हि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी गेट परीक्षेत ६६५ मार्क्स मिळवून ऑल इंडिया रँक १४७४ मिळवून आयआयटी मुंबई याठिकाणी प्रवेश मिळवला आहे, तिचाही याठिकाणी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रूपनर, व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्यासह इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.आर बी शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, प्रा. डॉ. एन जी नार्वे,डॉ.तानाजी धायगुडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अभियांत्रिकी,पॉलिटेक्निक व फार्मसी विद्याशाखेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.