पंढरपूर- ‘आपल्या समाजातील महान व्यक्तींच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आपण जयंती साजरी करीत असतो. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय समाजासाठी व संस्कृती जतनासाठी महान कार्य केले. अहिल्यादेवींनी भारताच्या संस्कृतीचा वारसा असणारी अनेक मंदिरे व नदीघाट यांचा जीर्णोद्धार केला व त्यामुळे भारतीय धर्म संस्कृतीचे जतन होण्यास मोलाची मदत झाली. अनेक मंदिरांच्या त्या आश्रयदात्या देखील होत्या. अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी त्यांनी धर्मशाळांचे बांधकाम केले. तत्कालीन भारतीय समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी व महिलांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य नक्कीच संस्मरणीय आहे’ असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक व स्वेरीच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य डॉ. व्ही. जे. कुलकर्णी यांनी केले.
स्वेरीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. व्ही. जे. कुलकर्णी हे सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी स्वेरीच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य डॉ. व्ही. जे. कुलकर्णी व महाराष्ट्र शासनाच्या स्थापत्य विभागाचे माजी चीफ इंजिनिअर श्री. एम. एम. सुर्कुटवार या प्रमुख मान्यवरांची सर्वांना ओळख करून दिली. त्यानंतर या मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री. एम. एम. सुर्कुटवार हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले कि, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी फार मोठे योगदान दिले. त्यांच्या व्यक्तीमत्वात अनेक महान गुण होते. त्या गुणांपैकी कांही गुण जरी आपण आत्मसात केले तरी आपण एक यशस्वी जीवन जगू शकतो.’ यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, संस्थेचे विश्वस्त एच.एम. बागल, कॅम्पस इनचार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.