पुणे जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय; महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करा – अजित पवार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक

पुणे दि.२९ जानेवारी – जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविड विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावे, तर नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत. पुढील आठवड्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा, त्याबाबत तूर्तास सक्ती करू नये. १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत असल्याने लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, लसीकरण झाले नसल्यास विद्यार्थ्यांना लसीकणाबाबत सूचना देण्यात याव्या असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

लसीकरणामुळे मृत्यूच्या प्रमाणत घट होत असल्याने लसीकरणावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे तर शहरी भागात कमी आहे. ग्रामीण भागातील शाळांमधून लसीकणाची सुविधा दिल्याने हे प्रमाण वाढले असल्याने महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

लसीकरण वाहनासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संस्थाचालकांनी शाळेत कोविड नियमांचे पालन होईल आणि पात्र विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी शाळेतदेखील मास्कचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

*मास्क आवश्यकच!*
मास्क न वापरण्याविषयी मंत्रीमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अद्यापही कोविडचे संकट असल्याने नागरिकांनी मास्क वापरणे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यकच आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी चांगला मास्क वापरावा. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवावी, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा लवकर सुरू करण्याची सूचना केली. श्रीमती निलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आणि विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा तणाव असल्याने पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावे. शाळेतही विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही आणि ते एकमेकांच्या संपर्कात अधिक वेळ येणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे सांगितले.

बैठकीत सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात मागील आठवड्यात ९० हजार १३७ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील १०९ टक्के लाभार्थ्यांनी लशीची पहिली मात्रा तर ८५ टक्के लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या २३ टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करून ७५ लक्ष ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहितीही दिली.

बैठकीस आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here