पंढरपूर विकास आराखडा-कोणतंही पाडकाम न करता बनवलेला जनतेचा विकास आराखडा शासनाला सादर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर विकास आराखडा-कोणतंही पाडकाम न करता बनवलेला जनतेचा विकास आराखडा शासनाला सादर

पंढरपूरच्या विकासासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं केलेल्या प्रस्तावित आराखड्याला नागरिकांनी केलेल्या टोकाच्या विरोधानंतर आता शासनाच्या सूचनेनुसार, नागरिकांनी त्यांचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे. कोणत्याही शहराचा आराखडा नागरिकांकडून घेण्याची ही बहुदा देशातील पहिलीच वेळ असून शहरातील तज्ञ अभियंते आणि नागरिकांनी एकत्र येत 15 दिवसांत हा आराखडा तयार केला आहे. पुढच्या 50 ते 100 वर्षांचा विचार करून शासनानं चौफाळा ते महाद्वार घाट या मार्गावर कॉरिडॉर करण्याची घोषणा केली. यातूनच टोकाचा विरोध सुरु झाला होता. सध्या विठ्ठल मंदिर परिसरातील हा मार्ग केवळ 40 फूट रुंदीचा असून हा कॉरिडॉर मार्ग 400 फूटांपर्यंत रुंद करण्याची तयारी शासनानं सुरु केल्यावर जनतेतून टोकाचा विरोध सुरु झाला होता. याशिवाय शासनानं पंढरपूर शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनमधील 39 रस्त्यांच्या रुंदीकरणाची तयारी देखील केली आहे.

जनतेने बनवलेल्या आराखड्यात शासनानं करायचं ठरवलेली 10 विकास कामं कॉरिडॉरमध्ये न करता शासनाच्या मंदिर परिसरातील जागांवर करण्याचं नियोजित केलं आहे. शिवाय वादाचा कळीचा मुद्दा ठरलेल्या कॉरिडॉरची जागाच बदलून ती चंद्रभागेवरील सेतूवर प्रस्तावित केली आहे. याशिवाय शहरातील लोकमान्य विद्यालय, नगरपालिका, नगर वाचन मंदिर, टिळक स्मारक पटांगण, गोकुळ हॉटेल, महाद्वार शॉपिंग सेंटर या नगरपालिकेच्या जागांवर बहुतेक विकासकामं प्रस्तावित केली आहेत. याशिवाय मंदिर समितीचा सात मजली दर्शन मंडप, तुकाराम भवन या ठिकाणी इतर विकासकामं सुचवली आहेत.

शासनाच्या आराखड्यात ही विकासकामं करण्यासाठी 73554 चौरस मीटर जागा लागत असताना जनतेच्या आराखड्यात शासनाच्या 1 लाख 9 हजार चौरस मीटरवर ही विकासकामं प्रस्तावित केली आहेत. मात्र कोणतंही पाडकाम न करता भाविकांच्या गर्दीचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीनं बनविलेला जनतेचा आराखडा शासनाला कितपत मान्य होईल? हाही प्रश्न असणार आहे. जनतेच्या आराखड्यात भाविकांच्या दृष्टीनं अत्यंत सुटसुटीत नियोजन केलं असलं तरी टोकन दर्शन व्यवस्थेनुसार, हा आराखडा बनविण्यात आला आहे. या आराखड्यात चंद्रभागेवर शासनाच्या प्रस्तावित सेतूलाच कॉरिडॉर करायचं नियोजन केलं आहे. तर खाडी ग्रामोद्योगाच्या जागेवर नवीन दर्शन मंडप प्रस्तावित केला आहे. सध्याचा सात माजली दर्शन मंडप पाडून तिथे टोकन दर्शन रांग, दर्शन रांगेतील भाविकांसाठी प्रतिक्षालयं, मुखदर्शन व्यवस्था, आपात्कालीन यंत्रणा, मंदिर समिती कार्यालय, व्हीआयपी व्यवस्था आणि आरोग्य सुविधा प्रस्तावित केलं आहे. कोणतंही पाडकाम न करता बनविलेला हा आराखडा नागरिक, विठ्ठल भक्त आणि वारकऱ्यांच्या सूचनेनुसार, केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here