पंढरपूरच्या विकासासाठी सल्लागारांना पुरातन वाडे ,वास्तु यांना कोणत्याही परिस्थितीत बाधा न पोचवता विकास आराखडा करावा . सर्व मंत्री महोदय व ऊपसभापतींचे निर्देश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर कॉरिडॉरसंबंधी कार्यवाही बाबत विधान भवनात बोलावली बैठक

मुंबई, ता. १६ : पंढरपूर विकास आराखडयाबद्दल असलेल्या शंका आणि प्रश्न यांचे निराकरण करूनच पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत योग्य तो मार्ग काढण्यात यावा.
याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणारे सल्लागार आणि प्रशासन यांचा समन्वय झाला पाहिजे. वारकऱ्यांनी तयार केलेल्या प्रारूपाचा आराखड्यातील चांगल्या गोष्टीचा समावेश करता येऊ शकेल.
याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल. मात्र सदर बैठकीत होणाऱ्या चर्चेअंती मिळणाऱ्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ना. डॉ. गोऱ्हे यांना बैठकीपूर्वीच सांगितले होते.

वाराणसीमध्ये काय प्रकारचे पुनर्वसनाचे पॅकेज काय दिले, याची माहिती प्रशासनाने द्यावे असेही निर्देश मी देत आहे.आजच्या बैठकीतून चांगल्या प्रकारचा तोडगा यात निघू शकेल. स्थानिकांच्या सूचनांचे एकत्रीकरण करून जिल्हा प्रशासनाला द्याव्यात. त्यावरील संभाव्य उपाय योजना काय असतील, याची माहिती वारकऱ्यांना द्या. पंढरपूर आगामी काळात अतिशय सुविधाजनक असेल यावर लक्ष द्यावे. कोणत्याही पुरातन वास्तूंना धक्का लागणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल, असे आग्रही मत आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज या विषयावर विधान भवनात बैठक बोलावली होती. आ. मनीषा कायंदे यांच्या विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या आराखड्याबाबत नागरिकांच्या असलेल्या हरकती आणि त्यावरील संभाव्य उपाय योजनाबाबत माहिती दिली. मंदिर विकास, पंढरपूर विकास, वाळवंट विकास अशा विषयावर केलेली कामे, रस्ते, शौचालये यांची माहिती दिली.

तीर्थक्षेत्र पंढरपूर हे जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र असल्याने तिथे रोज हजारो भाविकांची वर्दळ असते. त्यानुसार आपण येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी हा कॉरिडॉर शासन तयार करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले की, पंढरपूर कॉरिडॉर हा वाराणसी पेक्षाही अधिक चांगला करायचा निर्णय आपण घेऊ. वाराणसी प्रमाणेच पंढरपूरला केंद्राने निधी दिला असला तरी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊनच पंढरपूरच्या विकासाचे वेगळे मॉडेल तयार करण्यात येईल. सर्वांना विश्वासात घेऊनच ही कार्यवाही होईल.

महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन स्तरावरून याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

पंढरपूरचे आ. समाधान औताडे म्हणाले, विकास करताना सर्वाचाच विचार व्हायला हवा. स्थानिकांना जास्त त्रास होणार नाही या प्रमाणे हा आराखडा राबविला पाहिजे. वारीच्या काळात निर्माण होणाऱ्या समस्यांवर ठोस उपाय झाले पाहिजेत. दर्शन रांगेचा कालावधी कमी करण्याबाबत विचार व्हावा.

विधान परिषद सदस्य आ. महादेव जानकर यांनी पंढरपूरचा विकास होण्यासाठी शासनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतलेल्या भूमिकेचे यावेळी त्यांनी स्वागत केले.

आ. मनीषा कायंदे यांनी ही उच्चस्तरीय बैठक घेतल्याबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे आभार व्यक्त केले. सर्वसामान्य भक्तांचे श्रद्धास्थान आणि दैवत असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात, अशी सर्वांची इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या. येथे अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

आ. सचिन अहिर यांनी सांगितले की, वारकरी बांधवांच्या सर्व भावना जपून पंढरपूरचा हा विकास झाला पाहिजे. या शहरातील सर्वांना न्याय मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या निमित्ताने या प्रक्रियेला सुरुवात होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

वारकऱ्यांच्या भावना जपून विकास व्हावा अशी अपेक्षा आ. अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. सोयी सुविधा नगरपालिकेच्या जागेत करता येतील का याचा विचार व्हावा असे ते म्हणाले. पुरातन वास्तू आणि वारसा स्थळांना धक्का लागता कामा नये. वारकऱ्यांना विश्वासात घेऊन हे नियोजन व्हावे.

विधान भवनात आयोजित या बैठकीला
मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, ना. उदय सामंत, ना. तानाजी सावंत, आ. सचिन अहिर, आ.
मनीषा कायंदे, आ. अमोल मिटकरी, आ. महादेव जानकर, आ. रणजीत सिंह मोहिते पाटील, आ. महादेव जानकर, आ. समाधान आवताडे, मंदिर समितीच्या माधवी निगडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे, पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील गावडे, पुरातत्व खात्याचे उपसंचालक वाहने, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद माळी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सहसचिव नगरविकास प्रतिभा भदाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मंदिर सल्लागार तेजस्विनी आफळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, पत्रकार सुनील उंबरे, सुनील दिवाण, आदित्य दादा फत्तेपूरकर, वीरेंद्र उत्पात, बाबा बडवे, रामकृष्ण महाराज वीर आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here