देशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

देशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन

 

सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना कालावधीमध्ये नागरिकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वन विभागाच्या ‘माझं रोप माझी जबाबदारी’ या अभियानात सहभाग नोंदवून जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

नेहरूनगर येथील सिद्धेश्वर वनविहारमध्ये वन विभागाच्या ‘माझं रोप माझी जबाबदारी’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात वनाचे क्षेत्र केवळ दोन टक्के असून क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यंदा जिल्ह्यात १६ लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सात लाख रोपे वन विभाग तर उर्वरित रोपे लोकसहभागातून लावण्यात येणार आहेत. या रोपांची निगा, जोपासना राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहभाग नोंदवावा. 

पृथ्वीच्या वातावरणाचा समतोल राखणे, पर्जन्यमान टिकवणे, जल व मृद संदारणेसाठी वृक्षारोपण महत्वाचे आहे. प्रत्येकाने वातावरणाशी निगडित स्थानिक रोपांना प्राधान्य देऊन वृक्षारोपण करावे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, असे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

यावेळी श्री. भरणे यांच्या हस्ते माझे रोप, माझी जबाबदारी अभियानाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी श्री. भरणे यांच्या हस्ते 20 गुंठे जागेत अटल आनंदवन घन प्रकल्पांतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीचा शुभारंभही करण्यात आला. याठिकाणी 20 गुंठे जागेत सहा हजार वृक्ष, उपवृक्ष आणि झुडपे यांची लागवड करण्यात येणार आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्रिकोणी पद्धतीने तीन रोपांची जवळजवळ लागवड करण्यात येणार असून कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष हे ध्येय आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच शासकीय जमिनीवर घन वन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रास्ताविक उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, 15 जूनपासून वन महोत्सव सुरू असून नागरिकांनी 50 हजार रोपांची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदविली आहे. सात लाख वृक्ष लागवडीबरोबर 750 गवत लागवडही करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात वन विभागाला ट्रॅंक्विलायझर गन सुपुर्द करण्यात आली. या गनमुळे हिस्त्र प्राण्यांना बेशुद्ध करता येते.

यावेळी 5 जून रोजी वन विभागातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, व्हिडीओ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते देण्यात आली.

निबंध स्पर्धा

खुला गट- अंजली जाधव (प्रथम, सोलापूर), सुरेखा केवटे (द्वितीय, मंद्रूप), छाया अगाजे (तृतीय, गुळवंची). शालेय गट- वरद बिराजदार (प्रथम, इयत्ता 8वी, अक्कलकोट), वैदेही मडसनाळ (द्वितीय, इ. 9वी, सोलापूर) आणि मयुरी साबळे (तृतीय, इ. 6वी, सोलापूर).

व्हिडीओ स्पर्धा

शर्मिला करपे (प्रथम), सम्यक पालखे (द्वितीय) आणि रत्नमाला माने (तृतीय).

यावेळी कोरोना काळात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनाही सन्मानित करण्यात आले. वनक्षेत्रपाल व्ही.एन. पवळे, वनरक्षक सोपान कळसाईत यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी वनक्षेत्रपाल जयश्री पवार, मुख्य लेखापाल संध्याराणी बंडगर, लेखाधिकारी सिद्धेश्वर सगरे, नरेंद्र दोडके यांनी परिश्रम घेतले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here