दुष्काळग्रस्तांना दिलासा… माणगंगेच्या मदतीला धावली कृष्णामाई..! आ.शहाजीबापूंचा पाठपुरावा, टेंभू प्रकल्पातून माणनदीत सोडले पाणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दुष्काळग्रस्तांना दिलासा… माणगंगेच्या मदतीला धावली कृष्णामाई..!

आ.शहाजीबापूंचा पाठपुरावा, टेंभू प्रकल्पातून माणनदीत सोडले पाणी

ऐन उन्हाळ्यात सांगोला तालुक्यातील टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे..उन्हाळ्यात पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक घेवून टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. टेंभूच्या पाण्याने आटपाडी तलाव भरल्यानंतर माण नदीत पाणी सोडले आहे. रविवारी दुपारपर्यंत टेंभूचे पाणी बलवडी बंधाऱ्यात दाखल झाले असून दहा दिवसांत मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे टेंभूच्या पाण्याने भरून देण्यात येणार असल्याची माहिती आ.शहाजीबापू पाटील यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत सांगोल्यातील जनतेला, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृष्णामाई माणगंगेच्या मदतीला धावली असल्याचे दिसून येत आहे.
सांगोला तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी टेंभू योजनेतून आवर्तन सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता. टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, उपअभियंता गायकवाड, शाखा अभियंता महेश पाटील यांची बैठक घेण्यात आली. आमदार शहाजीबापू पाटील यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून टेंभूचे माण नदीमध्ये पाणी सोडून खवासपूर ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कोणत्याही गावाला पाणी कमी पडू नये याची दक्षता घेण्याच्याही सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
टेंभू योजनेतून जुनोनी, हातीद, पाचेगांव, जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आले आहेत. तसेच टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडण्यात आले असून खवासपूर ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरून देण्यात येणार आहेत. ऐन उन्हाळ्यात टेंभूचे पाणी मिळाल्याने पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने माणनदी नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन उन्हाळ्यात टेंभूच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या पाण्याचा लाभ पिकांसह परिसरातील नागरिकांनाही मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात टेंभू प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन माण नदीत सोडल्याने बळिराजाच्या आशा पल्लवीत झाल्या असून या पाण्याचा जनावरांचा चारा, घास, कडवळ, मका या पिकांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे.

चौकट

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जीवाची बाजी लावली – आमदार शहाजीबापू पाटील

गेल्या साडेचार वर्षात टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा सिंचन प्रकल्पांतून पाण्याचे मोठ्या प्रमाणात आवर्तन सांगोला तालुक्याला मिळाले आहे. वंचित १२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या ८८३ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चाच्या स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली असून सुमारे ३९ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा या योजनेतून अतिरिक्त पाणी देवून तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. म्हैसाळ प्रकल्पाच्या सुधारित कामांसाठी ९९ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळे दुष्काळी सांगोला तालुका ही ओळख कायमस्वरूपी पुसली जाणार असून सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जीवाची बाजी लावली असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here