सौ.सीमाताई प्रशांतराव परिचारक यांची प्रमुख उपस्थिती.
भाळवणी पंढरपूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.शोभाताई वाघमोडे देशमुख यांनी मकर संक्रांत निमित्त त्यांचे तिसंगी येथील राहते घरी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी सौ.सीमाताई प्रशांतराव परिचारक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी, कमलताई तोंडे, पंढरपूर पंचायत समिती सभापती सौ.अर्चनाताई व्हरगर , सौ.ज्योती कैलासराव खुळे, महिला बालकल्याण माजी सभापती सौ.रजनीताई देशमुख, जि प सदस्य सौ.सविताताई गोसावी, पंढरपूर येथील सौ.मोनिका शहा ,तिसंगी गावातील महिला भगिनी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा सेविका यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
त्यावेळी उपस्थित महिलांचे स्वागत वाघमोडे देशमुख परिवार यांच्यावतीने केल्यानंतर आलेल्या महिला भगिनींना हळदी कुंकू ,तिळगूळ ,देऊन भेटवस्तू देण्यात आली. सदर चा कार्यक्रम हा फक्त महिलांच्या साठी ठेवण्यात आलेला होता.
यावेळी सौ.सीमाताई परिचारक यांनी मनोगत व्यक्त करून जिल्हा परिषद सदस्य सौ.शोभाताई वाघमोडे देशमुख यांनी ग्रामीण भागामध्ये हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने गावातील महिला भगिनींना आपल्या घरी बोलावून त्यांचा सन्मान केला, तसेच या दोन तीन तासाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना आपल्या कौटुंबिक व्यापातून मोकळेपणाने वावरण्याची संधी तसेच उपस्थित असलेल्या महिलांच्या बरोबर मोकळेपणाने हितगुज करण्याची संधी मिळवून दिल्याचे सांगितले. महिलांनी सर्वच क्षेत्रांमध्ये मोकळेपणाने वावरले पाहिजे , तसेच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ,असेही यावेळी सौ.सीमाताई यांनी सांगितले.
चंदाताई तिवाडी यांनी आपल्या खास शैलीत महिलांच्या समोर महिलांचे आरोग्य व त्यावरील उपाय याबद्दलची माहिती देऊन मार्गदर्शन केले व मनोरंजनही केले.
सौ.रजनीताई देशमुख यांनी महिला बालकल्याण कडील योजनांची माहिती देऊन महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले.यावेळी तिसंगी ग्रा.पं.सदस्या सौ.जनाबाई दिपक मासाळ,सौ.मंगल भगवान रणदिवे गार्डी ग्रा.पं.सदस्या सौ.पल्लवी शक्ती बाजारे तसेच पुणे येथील सामाजिक संस्थेकडून आदर्श माता पुरस्कार मिळालेल्या सौ.सीमा वामनराव शेळके यांचा सौ.सीमाताई परिचारक यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम संपल्यानंतर सर्वच महिलांना वाघमोडे देशमुख परिवार यांच्यातर्फे स्नेहभोजन देण्यात आले.
कार्यक्रमासाठी तिसंगी गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळी कुठेही पुरुष मंडळींचा हस्तक्षेप दिसून आला नाही. हा कार्यक्रम महिला व मुलींनी भाग घेऊन यशस्वीपणे पार पाडला.
उपस्थित असलेल्या सर्वच महिला भगिनींचे आभार वाघमोडे देशमुख कुटुंबियांच्या वतीने मानण्यात आले.