प्राचीन संस्कृती नदीकाठी वसलेली होती. नदी प्रदूषण रोखणे सर्वांची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमिवर चला जाणूया नदीला अभियान अंतर्गत कासाळगंगा नदी प्रदूषणमुक्त करत बारमाही वाहण्यासाठीच्या क्षेत्रीय उपचारासाठी कृती दलाची स्थापना करण्यात येत असून, यासाठी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी नियुक्ती करण्यात येत आहे. येत्या 1 मे पासून प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिली.
“चला जाणूया नदीला” अभियान अंतर्गत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीस अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जि. प. कार्यकारी अभियंता पंडित भोसले, जलसंपदा विभागाच्या उपकार्यकारी अभियंता संध्या अलझेंडे, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख, राज्य समन्वयक डॉ. सुमंत पांडे, नदी समन्वयक महेंद्र महाजन आणि बाळासाहेब ढाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. एम. पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, प्रकल्प कार्यक्षेत्रातील सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक, उमेदचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रभागा नदी आपला प्राण आहे. चंद्रभागा परिक्रमा करून जनजागृती करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अंतर्गत एक बैठक वसुंधरेसाठी घेण्यात आली आहे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत या ग्रामपंचायतींना 70 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये. घनकचरामध्ये जनावरांचे मलमूत्र जाऊ नये. गावात प्लास्टीक व्यवस्थापन व्हावे, हा या पाठीमागचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे म्हणाले, नदीकाठच्या गावांचा कृती दल तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. पंधरावा वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे संयोगिकरण करण्यात येत आहे. या गावात सर्व कुटुंबाला शौचालये, सार्वजनिक शौचालय व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे आराखडे करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
कासाळगंगा प्रकल्पांतर्गत कासाळगंगा नदीचे पुनरूज्जीवन करण्यात आले आहे. कासाळगंगाच्या धर्तीवर जिल्ह्यातील नद्या वाहत्या करण्यासाठी माण नदीचे पुनरूज्जीवन करण्यात येत असल्याचे सांगून जलयुक्त शिवार टप्पा 2, सामाजिक वनीकरण, जलसंपदा, जलसंधारण विभाग, ग्रामविकास व कृषि विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग या विभागांचा अंतर्गत कृतीसंगम करून मध्यम मुदतीचे व दीर्घ मुदतीच्या कामांचे नियोजन करावे, असे डॉ. सुमंत पांडे यांनी यावेळी सांगितले.
कासाळगंगा प्रकल्पअंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती महेंद्र महाजन यांनी यावेळी दिली.
या बैठकीत चला जाणूया नदीला उपक्रमांतर्गत पूर आणि दुष्काळाच्या वैश्विक समस्येवर उपाय व ग्रामविकासाला चालना हा कासाळगंगा नदी समन्वयकांनी दिलेला अहवाल जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीकृतीसाठी सादर करण्यात आला. नदी प्रदूषण रोखून ती अमृतवाहिनी होण्यासाठी करावयाची विभागनिहाय कार्यवाही या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे.
Home ताज्या-घडामोडी चला जाणूया नदीला अभियानांतर्गत कासाळगंगा कृती दलाची स्थापना– मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप...