पंढरपूर दि. (24):- समाजात प्रत्येक व्यक्तीचा कुठल्याही निमित्ताने ग्राहक म्हणून संबध येतो. बाजारातील अनेक बनावट वस्तू व भेसळ वस्तूंच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते. ग्राहकांनी बाजारातून खरेदी करताना अधिक सजग व जागृत राहून खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के देयक विक्रेत्यांकडून घ्यावे, तो ग्राहकाचा अधिकार आहे असे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले.
तहसिल कार्यालय पंढरपूर व आखिल भारतीय ग्राहक पंचायत, पंढरपूर यांच्या सयुक्त विद्यमाने शेतकी निवास सभागृह, पंचायत समिती, पंढरपूर येथे राष्ट्रीय दिना निमित्त ग्राहक मेळावा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सहाय्यक उपनिबंधक एस.एम. तांदळे, नायब तहसिलदार पी.के.कोळी, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.पिसे, पुरवठा निरिक्षक जे.एम.कुंभार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरते, तालुका अध्यक्ष आण्णा ऐतवाडकर, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य नंदकुमार देशापांडे उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार श्री.बेल्हेकर म्हणाले, ग्राहक संरक्षण कायदा सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. प्रत्येक ग्राहकाने या कायद्याचा व्यवहारात वापर करायला हवा. यामुळे ग्राहकांचे हित अबाधित राहण्यास मदत होते. ग्राहकांनी आपली जबाबदारी ओळखून या कायद्याबाबत जनसामान्यात जनजागृती निर्माण करावी. तसेच वस्तुवरील किंमतीपेक्षा अधिक दराने वस्तू खरेदी करु नये, जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे, ही तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले.
ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची आपण अंमलबजावणी केली पाहिजे.जास्तीत जास्त नागरिकांना विशेषत: ग्रामीण भागात या कायद्याची माहिती व्हावी , लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ग्रामीण भागातही ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे सहा.गटविकास अधिकारी श्री.पिसे यांनी सांगितले.
ग्राहकांना आपले अधिकार माहित होणे आवश्यक आहे. आखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. यासाठी ग्राहकांनी जागरुक राहून आपले कर्तव्य विसरु नयेत असे अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरते यांनी सांगितले. ग्राहकांनी बाजारातून खरेदी करताना वस्तूचे पक्के देयक दुकानदारांकडून घ्यावे. यामध्ये ग्राहकाची जर फसवणूक झाली तर त्यांना ग्राहक पंचायतीकडून योग्य न्याय मिळवून देता येतो असे अ.भा ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष आण्णा ऐतवाडकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास पुरवठा विभागाचे वैभव बुचके, आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सहसचिव धनंजय पंधे, तालुका संघटक विनय उपाध्ये, तालुका सचिव आझाद अल्लापूरकर, उपाध्यक्ष पांडूरंग अल्लापूरकर उपस्थित होते.