कोल्हापूरात पूरस्थिती;पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

 

कोल्हापूरात गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पंचगंगा नदीने गुरुवारी दुपारी ३९ फूट या इशारा पातळी ओलांडली आहे. ८३ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर ते रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, गडहिग्लज, चंदगड असे प्रमुख राज्यमार्ग वाहतूकीसाठी पूर्ण बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे. बर्की (ता. शाहूवाडी) गावाचा संपर्क तुटला असून संध्याकाळपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे.

ढगफुटीसदृश्य पाऊस

जिल्ह्यात मंगळवारपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारपासून सुरु झालेला पावसाचा धिंगाणा गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह डोंगराळ तालुक्यात तर ढगफुटीसदृश्य अवघ्या कांही तासातच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

रत्नागिरी, गगनबावडा, चंदगड मार्ग बंद

भूईबावडा, करुळ घाटात दर कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक आंबोली व फोंडा घाटामार्गे वळवण्यात आली आहे. पण तेथे अनेक लहान मोठ्या ओढ्यांवर पाणी आल्याने राज्यमार्ग वाहतूकीसाठी बंद झाले आहेत. आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. आजरा ते गारगोटी, उत्तूर ते गडहिग्लज ते चंदगड मार्ग बंद आहे.

पंचगंगा इशारा पातळीवर

पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे तर इशारा पातळी ३९ फूट आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी ३८ फुट ८ इंच झाली असून कोणत्याही क्षणी नदी इशारा पातळी ओलांडणार असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी अतिवृष्टी कायम राहणार असल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत पंचगंगा नदी ४३ फूट ही धोक्याची पातळी ओलांडेल असा इशारा आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here