पंढरपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, निष्ठावान आणि होतकरू तरुणांची तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल, ही कार्यकारणी आगामी दिवसात काँग्रेसला मोठी उभारी देण्याचे कार्य पार पाडणार असल्याचे मत पंढरपूर तालुका काँग्रेसचे नूतन अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मागील काही दिवसांपासून काँग्रेसने देशात मोठी उभारी घेतली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा मजबूत होऊ पाहत आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस नेते प्रकाश पाटील, ज्येष्ठ नेत्या सुनेत्राताई पवार , यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात आपण काम करणार असून, पंढरपूर तालुक्यातील कार्यकारणी निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याचे काम केले जाणार असून, लवकरच ही कार्यकारणी जाहीर केली जाईल. याच कार्यकारणीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात काँग्रेसला आशादायक दिवस येतील, यावर आपला ठाम विश्वास आहे. पुढील दिवसात पंढरपूर नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्येही काँग्रेस आपले अस्तित्व नक्कीच दाखवणार आहे, असा आशावाद हनुमंत मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.
हनुमंत मोरे हे पंढरपूर तालुक्यातील भोसे गावचे रहिवाशी असून, बुधवारी त्यांना तालुकाध्यक्षपदाचे अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. गेल्या वीस वर्षापासून ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. समाजसेवक म्हणून त्यांनी केलेले काम तालुक्यास परिचित आहे. मा.तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांचे वारसदार म्हणून, त्यांनी मागील दिवसात तालुक्यातील काँग्रेसचे काम पाहिले होते. याचाच फायदा त्यांना झाला असून, त्यांना तालुकाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. मुंबईहून परत येताच त्यांनी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन , त्यांची दिशा स्पष्ट केली आहे.
चौकट-
पंढरपूर तालुका काँग्रेसमध्ये अनेक वर्षानंतर खांदेपालट झाली असून, मा. तालुकाध्यक्ष काँग्रेस नेते प्रकाश पाटील, हे स्वतःहून पायउतार झाले आहेत. त्यानंतर तालुकाध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येते, याची उत्सुकता पंढरपूर तालुकावाशीयांना होती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली, पंढरपूर तालुक्यातील गावागावापर्यंत काँग्रेसची ध्येयधोरणे पोहोचविणार असल्याचे मत हनुमंत मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.