आपल्या परिसराचा विकास साधनार्या संशोधनावर भर :श्री. रोहन परिचारक
कर्मयोगी आणि ‘कॅस्पर’ मध्ये सामंजस्य करार
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे स्थित भारतातील अग्रगण्य “सेंटर फॉर ऍडव्हान्सड स्टडिझ इन पॉलिसी रिसर्च” (कॅस्पर) या संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामार्फत कॅस्पर तर्फे कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेंटर फॉर एक्सलंस इन सोशओ-इकोनॉमिक डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन ची स्थापना करण्यात आली.
सेंटर फॉर ऍडव्हान्सड स्टडिझ इन पॉलिसी रिसर्चचे संशोधक पंढरपूर आणि परिसरचा अभ्यास करून व्हिजन २०३५ हा नावीन्यपूर्ण अभ्यास सादर करतील. या अभ्यासद्वारे पंढरपूर आणि परिसरातील विकासा संबंधी धोरण निर्मितीस भरीव मदत होणार आहे. कृषी, औद्योगिक तसेच संस्कृतिक यांसारख्या बाबींचा सखोल अभ्यास हे संशोधक प्रत्यक्ष येथे येऊन करतील. पंढरपूर हे महत्वाचे सांस्कृतिक केंद्र असून येथे विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. या क्षमता निर्मितीसाठी महत्वाचे संशोधन स्थानिक प्रशासन आणि महत्वाच्या संस्थांच्या सोबत काम करून व्हिजन २०३५ डॉक्युमेंट मार्फत मांडण्यात येणार आहे. त्याच बरोबर पंढरपूर परिसराचा सोशओ- इकोनॉमिक मॅपिंग करण्यात येईल. येथील जटिल, राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा देखील अभ्यास करण्यात येणार आहे. या करारा अंतर्गत कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शिकत असणार्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फील्ड वर जाऊन संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. या संशोधनातून त्यांना प्रगत असे आंतरविद्याशाखीय अध्ययन करता येणार आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना सेंटर फॉर ऍडव्हान्सड स्टडिझ इन पॉलिसी रिसर्चशी संलग्न जगभरातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या पूर्ण प्रक्रिये दरम्यान विद्यार्थी एक्सपिरीइनशील लर्निंग च्या प्रक्रिये द्वारे विविध संस्थात्मक भेटी करतील आणि इंडस्ट्री, तंत्रज्ञान, आर्थिक विकास या सर्व बाबींचा अभ्यास करू शकतील. याचा उपयोग विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या नोकरीच्या संधी मिळवण्यात तसेच स्वत:चे स्टार्ट अप सुरू करण्यात होणार आहे. अश्या प्रकारची नावीन्यपूर्ण संधी उपलब्ध करून देणारे कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय हे या परिसरातील नव्हे तर किंबहुना राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरणार आहे.
सेंटर फॉर ऍडव्हान्सड स्टडिझ इन पॉलिसी रिसर्चच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आणि जेष्ठ वकील श्री. जयंत आंधळगावकर व कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी सामंजस्य कारारावर स्वाक्षरी केली.
सदरच्या सामंजस्य करारावेळी श्री. पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. . एस पी पाटील, कॅस्परचे अध्यक्ष आणि जेष्ठ वकील श्री. जयंत आंधळगावकर, कॅस्परच्या चीफ ऑपरेशन ऑफिसर श्रीमती. योगिनी कुलकर्णी, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्रा. डी व्ही भोसले आदि उपस्थित होते.