कर्करोग बरा करतो असे सांगून फसवणूक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्करोग बरा करतो असे सांगून फसवणूक

(मनोहर मामा भोसले यांच्यावर बारामतीत गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल)

सोलापूर // प्रतिनिधी

संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहरमामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यासह त्याच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्करोग बरा करतो, असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत त्यांनी फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) या 23 वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली.
२० ऑगस्ट २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२१ दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मनोहर भोसले याने संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांना झालेला कर्करोग बरा करतो, असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.

ठार मारण्याची धमकी

विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीविताला भीती दाखवत फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.
दरम्यान मनोहरमामा भोसले विरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घेतली आहे.
फसवणूक झालेल्यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल घुगे अधिक तपास करत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here