(कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्याकडून घोषणा)
टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखाना सन 2022-23 या गाळप हंगामासाठी को-86032 या उसाच्या वाणाची लागवड करणा-या शेतक-यांना प्रतिटन शंभर रूपये जादा प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला असल्याचे कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांनी सांगितले.
भीमा कारखाना स्थापनेपासून शेतक-यांचे हित जोपासत आला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. भीमराव महाडिक यांनी दूरदृष्टी ठेवत व शेतकऱ्यांच्या हितासाठी भीमा कारखान्याची उभारणी केली. हा कारखाना मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा या तीन तालुक्याच्या मध्यभागी आहे. त्यामुळे तेथे तीन तालुक्याचे सभासद आहेत. सध्या अनेक वाणांच्या ऊस जातीचे संशोधन झाले आहे. त्यात को -262, को-8005, को-265 आदींसह अन्य ऊस वाणांचा त्यात समावेश आहे. को-86032 हे वाण शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, याची रिकव्हरी को 265 वाणापेक्षा ज्यादा बसते. त्यामुळे शेतक-यांना दर देता येतो. भविष्यात को-86032 या वाणाची तोच लागवड वाढावे व शेतकऱ्यांना जादा दर मिळावा यासाठी प्रतिटन शंभर रुपये प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे उपस्थित होते.