आंधळगाव व इतर १० गावांचे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव व इतर गावांचे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांचेकडून जल मिशन कृती आराखड्यामध्ये १० कोटी रुपये निधी तरतूद झाली असल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. सदर निधी तरतूद बाबतचे पत्र आमदार कार्यालयास प्राप्त झाले आहे.

या भागातील गावांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन आ. समाधान आवताडे यांनी सतत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. आ. आवताडे यांच्या पाठपुराव्याची व या योजनेबद्दल केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेऊन या योजनेस निधी तरतूद केली आहे.

आंधळगाव व इतर १० गावांच्या प्रादेशिक नळ पुरवठा योजना सन १९९८ रोजी मंजूर होऊन २००६ मध्ये कार्यान्वित झालेली होती. सदर योजनेस जवळजवळ १५ वर्षे झाल्याने पंप व भिमा नदीवरून प्लॅटकडे येणारी पाईप लाईन व पाणी पंप खराब झालेली आहे. त्यामुळे सदर योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. या योजनेमध्ये लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव,कचरेवाडी, अकोला, मारापूर, घरनिकी, महमदाबाद (शे),मल्लेवाडी, देगांव, ढवळस आणि धर्मगांव व निम शहरी असणारी संत चोखामेळानगर व संत दामाजीनगर ही  गावे समाविष्ट आहेत. सन २०२१ मधील हिवाळी अधिवेशनामध्ये आ. समाधान आवताडे यांनी कपात सूचना अन्वये या योजनेसाठी सरकारचे लक्ष वेधून घेतले होते त्या अनुषंगाने आ. आवताडे यांची सदर योजनेबद्दल असणारी तळमळ बघून सरकारने या योजनेस निधी तरतूद केली आहे.

या योजनेच्या दुरुस्तीसाठी सदर आंधळगाव व इतर १० गावांचे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा जल जीवन मिशन अंतर्गत योजनेमध्ये दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकामध्ये जल जीवन मिशन निधी अनुसार १० कोटी रुपये तरतूद करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाला आदेशीत केले आहे.

कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांमध्ये पाण्याचे खूप मोठे दुर्भीक्ष बारमाही जाणवत असते. अशा दुष्काळी खाईत लोटलेल्या तालुक्यातील जनतेचा पाणीप्रश्न हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मतदारसंघातील जनतेला पायाभूत सोयी – सुविधा मिळाव्यात यासाठी आ. समाधान आवताडे सुरुवातीपासूनच आग्रही आहेत.

चालू अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आंधळगाव व इतर १० गावांचे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा या योजनेला निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. समाधान आवताडे यांनी विशेष प्रयत्न करून या निधीचा प्रश्न मार्गी लावला आहे. सदर योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्याने मंगळवेढा तालुक्यातील या योजनेत समाविष्ट गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास खूप मोठा हातभार लागणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here