अल्पसंख्याक समाजातील युवकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळवून द्यावा -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, दि.9 (जिमाका):- जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील युवकांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नती होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून आले पाहिजेत. यासाठी सर्व संबंधित विभागांनी या समाजातील युवकांना विविध शासकीय योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अल्पसंख्यक युवकांची आर्थिक, शैक्षणिक उन्नती घडवणे बाबतच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी जिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव डी. डी., सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एन. व्ही. अजनाळकर, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी कादर शेख, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे श्री. उबाळे व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती बाबतचे लाभ तात्काळ द्यावेत. एक ही विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी शालेय व महाविद्यालय स्तरावर त्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना काळजी घेतली जावी. तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. या विद्यार्थ्यांचे शाळा गळतीचे प्रमाण अत्यंत कमी असले पाहिजे याचीही दक्षता घेतली जावी, असे त्यांनी सूचित केले.

     कौशल्य विकास विभागामार्फत अल्पसंख्याक युवकांना विविध रोजगार व स्वयंरोजगार बाबतचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करावे. या विभागाचे प्रशिक्षणाचे सर्व कोर्सेस तात्काळ सुरू करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले. क्रीडा विभागाने अल्पसंख्याक युवकांना विविध प्रकाराचे तसेच या भागात व्यायाम शाळा सुरू कराव्यात असेही त्यांनी सांगितले. 

     यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, मनपा शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, महिला व बालविकास, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निरंतर शिक्षण विभाग, क्रीडा विभाग इत्यादी विभागांचा आढावा घेऊन या सर्व विभागांनी अल्पसंख्याक युवकांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या योजना पोहोचवून प्रबोधन करावे व या युवकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा. तसेच जिल्ह्यातील एकही अल्पसंख्यांक नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही या बाबत ही प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

         अल्पसंख्याक बहूल क्षेत्रात संबंधित विभागाने त्यांच्या मार्फत सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले. तसेच 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने त्यांच्या स्तरावरून या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करावी, असेही त्यांनी सुचित केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here