पंढरपूरच्या सोमनाथची इस्रोत भरारी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूरच्या सोमनाथची इस्रोत भरारी
विशेष म्हणजे यासाठी भारतातून दहा जणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी आहे.
सोलापूर // प्रतिनिधी
आई-वडील आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोल मजुरी करत असतानाही सरकोली (ता.पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सोमनाथ नंदू माळी या युवकाने जिद्दीने शिक्षण घेत थेट इस्रो (ISRO) पर्यंत मजल मारली आहे. नुकतीच त्याची तिरुअनंतपुरम (केरळ) येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी भारतातून दहा जणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी आहे.
आई शोभा व वडील नंदू हे अशिक्षित तर एकमेव भाऊ सचिन आणि बहिणही केवळ सातवीपर्यंतच शिकलेली असताना सरकोली सारख्या ग्रामीण भागातून सोमनाथने मिळवलेले यश लक्षणीय आहे. गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून सातवीपर्यंतचे तर माध्यमिक शाळेतून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सोमनाथने अकरावी शास्त्र शाखेत पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे विनायक परिचारक यांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःतील क्षमतेची जाणीव होऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा निश्चय सोमनाथने केला. याच वेळी अशिक्षित वडील सोमनाथच्या शिक्षकांना भेटायचे तेव्हा मुलाचे कौतुक ऐकून त्यांचा ऊर अभिमानाने भरून यायचा.
शिक्षणातील ग म भ न देखील कळत नसताना आपल्या मुलाने शिकून खूप मोठे व्हावे असे त्यांना वाटायचे. त्यातूनच ते आठवडाभराच्या नवरा-बायकोच्या मजुरीतून निम्मी मजुरी सोमनाथच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवायचे. घरच्या परिस्थितीची जाणीव आणि जोडीला मित्र व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे 2011 साली बारावी 81 टक्के गुणांसह पास झाल्यावर सोमनाथ बिटेक साठी मुंबईला गेला. तेथे 2015 साली तो 8.1 ग्रेड घेऊन पहिल्या दाहमध्ये आला. त्यानंतर दिलेल्या GATE परीक्षेत संपूर्ण भारतातून 916 वा क्रमांक पटकावत त्याची IIT साठी दिल्ली येथे मेकॅनिकल डिझाइनर म्हणून निवड झाली. दरम्यानच्या काळात दोन वेळा दिलेली UPSC ची पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेत मात्र त्यास अपयश आले.
एमटेक पूर्ण केल्यानंतर कोठेतरी स्थिर व्हावे म्हणून त्याने इन्फोसेस मध्ये नोकरी देखील पत्करली. या ठिकाणी त्यास विमानाच्या इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी मिळाली. पण सुरुवातीपासूनच इस्रो मध्ये काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असल्याने नोव्हेंबर 2019 रोजी त्याने त्यासाठी अर्ज केला. एमटेकचे शिक्षण आणि इन्फोसिस मधील नोकरीचा अनुभव लक्षात घेऊन त्याची प्रथम लेखी परीक्षेसाठी आणि नंतर तोंडी परीक्षेसाठी निवड झाली. 13 एप्रिल 2021 रोजी चाळीस मिनिटे चाललेल्या तोंडी परीक्षेत दहा जणांच्या टीमने त्याचे नॉलेज आणि ते प्रत्यक्षात कशा पद्धतीने वापरू शकतो. या अनुषंगाने प्रश्न विचारले. अखेर सोमनाथला 2 जून रोजी इस्रो मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याचा मेल मिळाला. उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होतानाच कुटुंबियांच्या घामाचे सोने झाल्याचा आनंद सोमनाथच्या चेहऱ्यावर पसरला.
सोनेरी यश बारा दिवस ठेवले झाकून दोन जून रोजी निवड झाल्याचा मेल सोमनाथला मिळाला खरा, पण त्याने या यशाचा सामना हुरळून न जाता अत्यंत संयमाने केला. त्या दिवशी तो दिल्लीत होता. स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी तो ताबडतोब सरकोली (ता.पंढरपूर) या गावी येण्यास निघाला. पण सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता जर आपली इस्रोमध्ये निवड झाल्याचे घरी सांगितले तर ही बातमी गावात आणि तालुक्यात सगळीकडे पसरून लोक घरी गर्दी करतील. या विचाराने त्याने एवढी मोठी बातमी वडिलांव्यतिरिक्त कोणालाही सांगितली तर नाहीच पण गावी आल्यानंतरही स्वतःला दहा दिवस काॅरंटाईन करून घेतले. या बारा दिवसात त्याने आणि वडीलाने निवड झाल्याचे स्वतःच्या आईसह कोणालाही सांगितले नाही. शेवटी काॅरंटाईनचे दहा दिवस पूर्ण झाल्यानंतरच आपला आनंद सर्वांसोबत शेअर करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा: पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? व
आता यावर करायचे आहे संशोधन भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांनी जेथून आपल्या कामास सुरुवात केली होती. त्याच इस्रोमध्ये थेट वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्यानंतर आता सोमनाथलाही त्यांच्याच तोडीस तोड काम करायचे आहे. त्यासाठी तो इस्रोच्या भविष्यातील विशेष मोहीमा असणाऱ्या चांद्रयान 3, भारतीय अंतराळ स्थानक, पुनर्निर्मितीक्षम अवकाश यान या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळावी अशी सोमनाथची इच्छा आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here